– उत्तम आरोग्यासह विश्वशांती साठी योग आवश्यक – राज्यपाल रमेश बैस
मुंबई :- योग ही भारताची जगाला अनमोल देणगी आहे. योगाच्या अमूर्त ठेव्याचे रक्षण करणे व त्याचा प्रचार – प्रसार करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य उत्तम राखण्यासह योग विश्वशांती प्रस्थापित करण्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २१) राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
योगसत्राचे आयोजन ‘कैवल्यधाम’ व श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर योग या संस्थांतर्फे संयुक्तपणे करण्यात आले. भारतीय तटरक्षक दल, सूचना प्रसारण कार्यालय व राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी राज्यपालांसह योगासने केली.
भारत जगातील सर्वाधिक युवा राष्ट्र आहे. योग देशातील युवाशक्तीच्या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक सशक्तीकरणात मदत करून स्वस्थ भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सहायक सिद्ध होऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. आपण स्वतः नियमित योगासने करतो व प्रत्येक दिवस आपल्याकरिता योग दिवस असतो असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेचे विश्वस्त आत्मप्रीत रक्षित, रतन लुणावत व अल्पा गांधी तसेच कैवल्यधाम योग संस्थेचे रवी दीक्षित प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी रवी दीक्षित व देवकी देसाई यांनी योगसत्राचे संचलन केले.