‘पौर जनहिताय’ हे ध्येयवाक्य पुढे ठेवून कार्य करा – मनपाच्या स्थापना दिनी आयुक्तांचे अधिकारी व कर्मचा-यांचे आवाहन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे ध्येयवाक्य ‘पौर जन हिताय’ हे आहे. समाजातील शेवटच्या दुर्बल घटकापर्यंत मनपाच्या सुविधा पुरविणे, त्यांच्या जीवनात सुलभता आणण्याचे मनपाचे ध्येय आहे. महानगरपालिकेचे ‘पौर जन हिताय’ हे ध्येयवाक्य पुढे ठेवून प्रत्येकाने कार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अधिकारी व कर्मचा-यांना केले.

नागपूर महानगरपालिकेचा ७३वा स्थापना दिन शनिवारी २ मार्च रोजी मनपा मुख्यालयात साजरा झाला. यावेळी आयुक्त बोलत होते. मंचावर अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेचे पहिले महापौर दीवंगत बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

यावेळी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर शहरातील सर्व नागरिक, मनपातील अधिकारी, कर्मचारी, शहरातील स्वयंसेवी संस्था आदी सर्वांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७३ वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध इतिहास लाभलेल्या नागपूर महानगरपालिकेची मुळं जनतेच्या विश्वासाने आणि सहकार्याने अधिक घट्ट होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मनपाच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकताना आयुक्तांनी १८६४ साली स्थापन झालेली नगरपालिका ते १९५१ साली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या नागपूर महानगरपालिकेचे बदलते स्वरूप आणि कार्याचा वाढता अवाका याचा आढावा घेतला. शहराची केंद्रीय संस्था म्हणून येथील महिला, विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठआणि सामान्य नागरिक या सर्व घटकांना मुलभूत सुविधा प्रदान करण्यास मनपा कटिबद्ध आहे, असा विश्वास देखील मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.

नागपूर शहरातील नागरिकांसाठी काम करीत असताना, येथील जनतेला मुलभूत सुविधा प्रदान करताना संस्थेच्या बळकटीकरणाकडे देखील विशेष लक्ष देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूर शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बळकटीकरणासाठी येथील लोकप्रतिनिधी, जनता, स्वयंयेवी संस्था, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार या सर्वांचे बहुमूल्य योगदान असल्याचे आयुक्त म्हणाले. मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत. मात्र त्यामुळे जनतेच्या समस्यांबाबत दुर्लक्ष होउ नये याकरिता लोकांशी नाळ जोडून ठेवणे आवश्यक आहे. मुलभूत सुविधा प्रदान करताना संस्थेला बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, निगम सचिव  प्रफुल्ल फरकासे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, प्रकाश वराडे, गणेश राठोड, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी साधना सयाम, क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, लेखाधिकारी बावनकर, कार्यकारी अभियंता  अल्पना पाटणे, सर्वश्री विजय गुरुबक्षाणी, कमलेश चव्हाण, योगेंद्र राठोड, रवींद्र बुंधाडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. विजय जोशी, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत, तेजस्विनी महिला मंचच्या किरण मुंधडा, कंत्राटदार संघटनेचे विजय नायडू आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त निर्भय जैन यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले व शेवटी त्यांनी आभार देखील मानले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी जिंकली उपस्थितांची मने

मनपाच्या स्थापना दिनी नागपूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण केले. वाठोडा उच्च प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आराध्या नायकर हिने गणेश वंदना सादर केली. पारडी उच्च प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्य तर संजयनगर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी छत्तीसढी नृत्य सादर केले. या सर्व सादरीकरणावर उपस्थितीत मान्यवरांसह सर्वांनी टाळ्यांची दाद देउन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षण विभागाचे प्रकाश कलसिया, कमलाकर मानमोडे, प्रफुल्ल शेटे (तबला) आणि आशिष उसरवरसे यांनी देशभक्तीपर उत्कृष्ट गीतांची श्रृंखला सादर केली.

नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासावर एक दृष्टिक्षेप

भारताचे झिरो माईल अशी ओळख असलेले व भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूर शहराची पालकसंस्था नागपूर महानगरपालिकेला शनिवारी २ मार्च २०२४ रोजी ७३ वर्षे पूर्ण झाली. मागील ७३ वर्षाच्या काळात ५४ महापौर, ५६ उपमहापौर आणि ५१ आयुक्तांची सेवा नागपूर महानगरपालिकेला लाभली आहे. शहराला ५१ वे आयुक्त म्हणून लाभलेले डॉ. अभिजीत चौधरी हे १४ वे प्रशासक म्हणूनही कार्यभार सांभाळत आहेत.

२ मार्च १९५१ रोजी नागपूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर श्री. जी. जी. देसाई यांची प्रारंभी प्रशासक म्हणून आणि नंतर १ जुलै १९५२ रोजी महानगरपालिकेचे प्रथम मुख्य कार्याधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती झाली होती. देसाई यांच्याच कार्यकाळात (१३ व १५ जून १९५१) नागपूर महानगरपालिकेची सर्वप्रथम सार्वत्रिक निवडणूक पार पडली आणि शहराच्या तत्कालीन ४२ वॉर्डातून ४२ सदस्य निवडून आले. शिवाय त्यावेळच्या नियमानुसार नागपूरचे चेंबर ऑफ कॉमर्स, नागपूर विश्वविद्यालय, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर जनपथ सभा, मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे व सूतगिरण्यांच्या संचालकांच्यावतीने प्रत्येकी एकेका सदस्याची नियुक्ती महानगरपालिकेवर करण्यात आली होती. नंतर १ जुलै १९५२ रोजी वरील निर्वाचित नवनियुक्त सदस्यांनी सहा अतिरिक्त सदस्यांची निवड केली. शेवटी वरील प्रमाणे निर्वाचित ४२ नियुक्त ९ आणि निवडलेले ६ मिळून एकूण ५७ सदस्यांतर्फे दि. २० जुलै १९५२ रोजी महापौर, उपमहापौर व स्थायी समितीच्या दहा सदस्यांची निवड करण्यात आली. परिणामी बॅ. शेषराव वानखेडे हे नागपूर नगरीचे सर्वप्रथम महापौर,  छोटेलाल माधवजी ठक्कर हे उपमहापौर आणि सदुभाऊ दंडिगे हे स्थायी समितीचे सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून कार्यरत झाले. नागपूर नगरपालिकेचा दर्जा वाढून तिचे रुपांतर महानगरपालिकेत करताना शेजारची ३४ खेडी नागपुरात विलीन करण्यात आली होती. यामुळे नागपूरचे विशाल नागपूर झाले होते. नागरिकांनी या घटनेचे स्वागत केले. त्यामुळे शहराची सीमा २१७.५६ चौ.कि.मी. इतकी झाली.

नागपूर शहराचे प्रथम महापौर दिवंगत बॅरीस्टर शेषराव वानखेडे यांनी महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपाध्यक्ष, महाराष्ट्र सरकारमध्ये अर्थमंत्री अशी जबाबदारी पार पाडली. यासोबतच तत्कालीन भारतीय क्रिकेट मंडळ चे १८ वे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी नागपूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शहराचे माजी महापौर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले. ते सध्या उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभेचे विरोधीपक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली, ही शहराचे नावलौकीकात भर टाकणारी बाब आहे. शहराचे महापौर राहिलेले विकास ठाकरे व प्रवीण दटके विद्यमान आमदार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Mar 2 , 2024
– सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन नागपूर :- व्यवसायामध्ये मानवी संबंधांना देखील खूप महत्त्व आहे. आपण सहकाऱ्यांसोबत कसे वागतो, कसे बोलतो, आपले नेतृत्व कसे आहे यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. त्यामुळे ‘मानवी संबंधांचे व्यवस्थापन’ कसे करायचे याचाही अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com