नागपूर :-ज्यावेळेस महिलांना समाज व्यवस्थेमध्ये स्थान नव्हते त्यावेळी तथागत बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये महिलांना प्रमुख स्थान दिले. त्यापुढे जाऊन धम्म प्रचारासाठी महिलांचा भिक्षुणी संघ स्थापन केला, सर्वसामान्य महिलांना धम्माचे ज्ञान मिळावे यासाठी कथेच्या रूपात त्याची पाली भाषेत मांडणी केली. जर महिलांनी बुद्ध धम्मातील जीवन पद्धतीचा अवलंब केला तर आपले जीवन समृद्ध झाल्या शिवाय राहणार नाही असे विचार राज्य राखीव पोलीस बलाच्या अधीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे यांनी व्यक्त केले.
डॉ प्रियंका नारनवरे ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रात झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, नागपूर विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम, पाली विभागाच्या प्रा डॉ तुळसा डोंगरे, प्रा सरोज वानी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी होते.
डॉ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी मार्गदर्शन करतात बौद्ध ही जीवन पद्धती आहे, बुद्ध हे मार्गदाता आहेत, यांच्या या पद्धतीने जीवन जगल्यास भारत बौद्धमय होऊ शकतो व प्रत्येक व्यक्ती हा बुद्ध होऊ शकतो. कारण बुद्धांने सर्वप्रथम महिलांना समान दर्जा दिला असा विचार व्यक्त केला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यावेळी डॉक्टर प्रियंका नारनवरे, डॉ तुळसा डोंगरे, प्रा सरोज वाणी, डॉ रेखा बडोले, डॉ ज्वाला डोहाने, प्रा पुष्पा ढाबरे, प्रा रोमा हर्षवर्धन, डॉ सुजित बोधी यांना यावेळी डी टी रामटेके, राणी चांदुरकर, सिद्धार्थ फोपरे, विजय वासनिक, उत्तम शेवडे, मोरेश्वर मंडपे, शुभांगी देव आदींनी पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी निशा वानखेडे, पुष्पा ढाबरे, सुनंदा भैसारे, डॉ रोमा हर्षवर्धन, रंजना ढोरे, डॉ सुजित वनकर, ऍड अवधूत मानटकर, अमर सहारे, कैलास सहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अर्चना लाले यांनी तर समापन शुभांगी देव यांनी केले. पाली व बौद्ध अध्ययन विभागात झालेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.