इंदिरा गांधी रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीर
नागपूर :- नवरात्रीचे औचित्य साधून सोमवारी इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, म.न.पा.नागपूर येथे इंदिरा गांधी रुग्णालय आणि तेलंगखेडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरात १८ वर्षावरील स्त्रीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात उपस्थित तज्ज्ञांकडून महिलांची कर्करोग, दंतरोग, सोनोग्राफी, मॅग्नोग्राफी, रक्त तपासणी, इ.सी.जी. एक्सरे, पॉप्समेहर, बी.पी., शुगर इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबीराचा परिसरातील सुमारे ३०० महिलांनी लाभ घेतला.
आरोग्य शिबीरात प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. विनिता जैन, म.न.पा.चे आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन किंमतकर, तेलंगखेडी यूपीएचसी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विभूती पानबुडे आदी उपस्थित होते.
शिबिरात डॉ. जैन यांनी महिलांचे आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकीत, महिलांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करून नियमीत तपासणी करावी असे आवाहन केले. वयाच्या विविध टप्यात येणाऱ्या आरोग्य विषयक समस्यांचे कशा पद्धतीने निराकरण करावे, त्यासाठी कोणत्या तपासण्या आवश्यक आहेत, याबाबत डॉ. जैन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी जास्तीत-जास्त महिलांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच डॉ. कांचन किंमतकर यांनी स्त्रीयांना चाळीशीनंतर येणाऱ्या मानसिक, शारीरीक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. शिबिरात डॉ. खंडागळे, डॉ. अखिलेश शेवाळे, डॉ. बनकर, डॉ. आंबुलकर यांनी मार्गदर्शन केले. संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अल्का शेवाळे यांनी केले आणि आभार ईश्वर मेश्राम यांनी मानले.
प्रा.अल्का शेवाळे, डॉ.पानबुडे, डॉ. गडवे, यू.पी.एच.सी. परिचारिका, डॉ. संधी व इतर कर्मचारी व सहकारी डॉ. पडोळे यांनी शिबीर यशस्वीतेसाठी सहकार्य केले.