नागपूर जिल्ह्याला 250कोटी तर भंडारा जिल्ह्याला 100 कोटी निधी
अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण
विदर्भातील जल पर्यटनाला नवी दिशा मिळणार
अंभोरा केबल-स्टेड पुल म्हणजे ‘स्टेट ऑफ आर्ट’
नागपूर :- पर्यटनातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी 350 कोटीचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात आला आहे, याअंतर्गत भंडारा जिल्ह्याला 100 कोटी तर नागपूर जिल्ह्याला 250 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विदर्भात पर्यटनाचे सर्किट तयार करून वनपर्यटनासोबतच जल पर्यटन क्षेत्राचा विकास तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर-भंडारा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या अंभोरा येथे वैनगंगा नदीवरील केबल-स्टेड पुलाचे लोकार्पण व भंडारा जिल्ह्यातील पहेला-अंभोरा सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी फडणवीस बोलत होते.
खासदार सर्वश्री कृपाल तुमाने, सुनील मेंढे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, आमदार राजू पारवे यावेळी उपस्थित होते.
अंभोरा पुलाच्या मध्यवर्ती भागातून परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, पाच नद्यांचा संगम आणि वनक्षेत्र पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरी हे या पुलाचे वैशिष्ट आहे. यामुळे पर्यटकांना सुविधा झाली आहे. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग असल्यामुळे आंभोरा परिसरात जल पर्यटन विकासाचे काम करण्यात येणार आहे. यातून विदर्भातील जल पर्यटनाला नवी दिशा मिळून बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स, पाण्यातले साहसी खेळ, हॉटेल व्यवस्था आदी उद्योगातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार असून गोसेखुर्द प्रकल्पाचे वाहून जाणारे पाणी सहाशे किलोमीटर कॅनल द्वारे नागपूर-वर्धा-यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून संपूर्ण विदर्भात सिंचनाचे जाळे तयार करण्यात येणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तां च्या संदर्भात विशेष बैठक घेण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडगरी यावेळी म्हणाले की अंभोरा केबल-स्टेड पुल म्हणजे ‘स्टेट ऑफ आर्ट’ प्रकल्पाचे उत्तम उदाहरण असून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि वैशिष्ट्यांचा समावेश असलेला हा अत्याधूनिक पूल आहे. याठिकाणी नागपूरच्या फुटाळा-शो प्रमाणे लाईट व साऊंड शो लवकरच सुरू करण्यात येणार आहे यात अे.आर. रहेमान यांचे संगीत घेतले आहे. हा पूल व शो बघण्यासाठी जगातील पर्यटक येथे येतील. अंभोरा परिसरात पर्यटनातून रोजगार उपलब्ध होण्याची सुरूवात या पुलामुळे झाली असल्याचे ते म्हणाले. पूर्वी या भागातील लोकांना भंडारा जाण्यासाठी ६० किलोमीटरचा फेरा पडत होता आता पुलामुळे भंडाऱ्याचे अंतर केवळ २० किलोमीटरवर आले आहे. या पुलामुळे येथील वाहतुकीची समस्या सुटेल व दळणवळाणाचा खर्च देखील कमी होईल. गोसेखुर्द जल पर्यटनाचा जागतिक दर्जानुसार विकास करण्यात येईल पर्यटनातून येथील स्थानीकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही गडकरी यांनी सांगितले.
यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार राजू परवे यांनीही मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. एकमेव केबल स्टेड पूल असलेल्या अंभोरा पुलाची लांबी 705.20 मीटर असून या प्रकल्पाचे एकूण किंमत 178 कोटी रुपये इतकी आहे. पुलाच्या मध्यभागी ४० मीटर उंचीवर प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली यात एकावेळी दिडशे लोक बसू शकतात, अशी व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भंडारा जिल्ह्यातील पहेला-अंभोरा हा रस्ता ७.६० किलोमीटर लांबीचा असून या प्रकल्पासाठी 24.90 कोटीची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणेचे पदाधिकारी व अधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.