राजभवन येथे प्रथमच मणिपुर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

– इतर देशांना भेट देण्यापूर्वी एकदा उत्तर पूर्व राज्यांना भेट द्यावी : राज्यपालांचे आवाहन

– सचिन देव बर्मन व आर डी बर्मन त्रिपुराची महाराष्ट्राला सर्वोत्तम भेट : राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- सन १९७२ साली मणिपूर, मेघालय व त्रिपुरा या तीन राज्यांची निर्मिती झाली. गेल्या ५२ वर्षांमध्ये तिन्ही राज्यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यटन, रोजगार यांसह जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करीत देशाच्या विकासात योगदान दिले आहे. आपण स्वतः उत्तर पूर्वेतील आठही राज्यांना भेट दिली आहे. इतर देशांना भेट देण्यापूर्वी देशातील लोकांनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आपल्या उत्तर पूर्व राज्यांना अवश्य भेट द्यावी व तेथील संस्कृती जाणून घ्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमा अंतर्गत रविवारी (दि. २१) महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मणिपुर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

आपण त्रिपुरा येथे दोन वर्षे राज्यपाल होतो. त्रिपुराने महाराष्ट्राला शतकातील श्रेष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन व त्यांचे सुपुत्र आर डी बर्मन, यांच्या रूपाने सर्वोत्तम भेट दिली आहे. उभय संगीतकारांचा अजरामर असा सांगीतिक ठेवा नेहमीच जोपासला जाईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.   

आद्य गुरु शंकराचार्यांनी देशातील विभिन्न दिशांना चार धर्मपीठ स्थापन केले. धार्मिक अधिष्ठानामुळे लोक पर्यटन करतील व इतर प्रदेशांना समजून घेतील हा दृष्टिकोन त्यामागे होता, असे सांगून, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रम देखील सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून देशाची एकात्मता वृद्धिंगत करणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

मणिपूर येथील ‘मोरेह’ शहर ‘पूर्व भारताचे प्रवेश द्वार आहे, तसेच म्यानमार व दक्षिण पूर्व आशियाई देशांशी व्यापार करण्याचा भूमार्ग आहे. मणिपुरने देशाला मेरी कोम सारखे उत्कृष्ट क्रीडापटू दिले असून राज्यात हातमाग उद्योग, हस्तशिल्प व रेशीम उत्पादनावर आधारित उद्योग विकसित आहे. मेघालय ही मेघभूमी असून ते स्वच्छ व प्रदूषणमुक्त राज्य आहे. त्रिपुरासह तिन्ही राज्यांची विविधता हेच त्यांचे बलस्थान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

विविध राज्यांना भेट देऊन तेथील संस्कृती, सण समजून घेतल्यास राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होण्यास मदत मिळते असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतातील लोकांना उत्तरपूर्व राज्यांबद्दल पुरेशी माहिती नाही. त्रिपुरा येथील राजघराणे जगातील सर्वात जुने राजघराणे आहे. त्या राज्यात अद्भुत असे उनाकोटी शिल्प आहे. मणिपूर राज्यात पोलो खेळाचा उगम झाला असे त्यांनी सांगितले. ‘एक भारत’ उपक्रमातून लोकांना ईशान्य भारताची माहिती होईल व राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल असे त्यांनी सांगितले. 

यावेळी त्रिपुरा येथून आलेल्या कलाकारांनी होजागिरी, लेबांग बुमानी व तंगबिती ही त्रिपुरा राज्याची लोकनृत्ये व संगीत सादर केले, तर मुंबईतील एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपुर व मेघालय राज्यांचे लोकनृत्य सादर केले. राज्यपालांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागला, अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, मुंबई निवासी असलेले उत्तर पूर्व राज्यातील निमंत्रित नागरिक व एचएसएनसी विद्यापीठाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भगवान प्रभू श्रीरामाच्या मिरवणुकीने येरखेडा दुमदुमले, ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत व प्रसादाचे वितरण

Mon Jan 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या पर्वावर तालुक्यातील येरखेडा येथील तारा माता मंदिर पंच कमिटीच्या वतीने भगवान श्रीराम व कलश यात्रेने दुमदुमले ठिकठिकाणी नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत करून प्रसादाचे वितरण केले सजविलेल्या रथावर भगवान श्रीराम, लक्ष्मण ,सीता ,हनुमान यांची येरखेडा ग्रामपंचायत चे माजी सरपंच मंगला मनीष कारेमोरे यांचे हस्ते पूजा आरती करून श्रीराम व कलश यात्रेला सुरुवात करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com