मुंबई : राज्य शासन सर्व घटकांच्या विकासासाठी सकारात्मक असून वातावरणातील बदलांमुळे अल निनोचा प्रभाव येणाऱ्या वर्षात जाणवू शकतो. त्यामुळे हे वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन संरक्षित सिंचनासाठी जलयुक्त शिवार टप्पा 2 आणि जलसंधारणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेनंतर राज्यपालांच्या आभाराचा ठराव मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह 30 सदस्यांनी यासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शासनाने मागील आठ महिन्यांच्या काळात जनहिताचे विविध निर्णय घेतले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सात हजार कोटी रूपयांची मदत केली आहे. 65 मि.मी. पावसाची मर्यादा न ठेवता सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात मदत देण्याचा निर्णय देखील शासनाने घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषांपेक्षा दुप्पट मदत देण्यात आली आहे. सन 2025 पर्यंत 30 टक्के फिडर सौर ऊर्जेवर आणणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज देता येईल, असे त्यांनी सांगितले. विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी आतापर्यंत 12 लाख 84 हजार शेतकऱ्यांना मदतीपोटी 12 हजार कोटी रूपये देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उर्वरित शेतकऱ्यांचे साक्षांकन पूर्ण झाल्यानंतर त्यांना मदत देण्यासाठी एक हजार 14 कोटी रूपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याच्या प्रश्नावर देखील शासन सकारात्मक असून यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. कांदा निर्यातीवर केंद्राची बंदी नाही, तसेच राज्यात 42 केंद्रांवर 45796 क्विंटल खरेदी करण्यात आली असल्याने हा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला दिलासा देताना 1553 अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली. उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून डावोस येथील आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेत 1.5 लाख कोटींचे करार करण्यात आले आहेत. ‘आपला दवाखाना’च्या माध्यमातून मोफत उपचार देण्यात येत असून राज्यात लवकरच 700 दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे.
राज्याच्या आणि देशाच्याही आर्थिक विकासाला हातभार लागावा आणि दळणवळण गतिमान व्हावे यासाठी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला असून पुढील टप्प्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यात संरक्षित सिंचनाकरिता जलयुक्त शिवार टप्पा 2 तसेच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून त्याच्या अंमलबजावणीवर भर देण्यात येणार आहे. राज्यातील 846 शाळांना केंद्र शासनाच्या मदतीने ‘पीएम श्री’ योजनेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त राज्यातही तृणधान्य उत्पादनाला चालना देण्यात येणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक भाव मिळावा यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शाश्वत विकासाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन वस्त्रोद्योग धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचे काम लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, सागरी मार्ग टप्पा-1, मेट्रोचे नवीन मार्ग यांची कामे देखील गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेट्रोची 337 कि.मी.ची कामे सध्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. इंदू मील येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम गतीने सुरू असून त्यांच्या परिवारातील सदस्यांना दाखवून पुतळ्याबाबतचे डिझाईन अंतिम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असून ती उठवावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.