– तत्पर सेवेसाठी महावितरणचा उपक्रम
नागपूर :- औद्योगिक ग्राहकांच्या दारी जाऊन तत्पर ग्राहकसेवा देण्यासाठी महावितरणकडून नागपूर शहर आणि नागपूर ग्रामिण मंडलासाठी ‘स्वागत सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. महावितरणच्य नागपूर शहर आणि नागपूर ग्रामिण मंडलच्या अधीक्षक अभियंता यांच्या अखत्यारित हा सेल सुरु करण्यात आला असून हा सेल औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी, इतर वीज सेवा देण्यासह बिलिंग व वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यास पुढाकार घेणार आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सेवा कायम ठेवून नवीन वर्षानिमित्त ही अतिरिक्त सेवा सुरु करण्यात आली आहे. ‘स्वागत सेल’शी संपर्क साधल्यानंतर संबंधित कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट ग्राहकांच्या दारी जाऊन कागदपत्रांची पुर्तता करण्यासह विनाविलंब सेवा देणार आहेत. औद्योगिक ग्राहकांना तत्पर व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. याअनुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी औद्योगिक ग्राहकांसाठी स्थानिक पातळीवर स्वतंत्र सेवा देणारी यंत्रणा तयार करण्याची सूचना केली. त्यानुसार ‘स्वागत सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे.
या सेलचे प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता (प्रशासन) असून नागपूर शहर मंडलासाठी नवीन वीजजोडणी, जादा वीजभार या मागणीसह वीजपुरवठा व बिलिंगच्या तक्रारी किंवा प्रश्न 787570008 या मोबाईल क्रमांकावर अथवा swagatcell_nagpuru@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर तर नागपूर ग्रामिण मंडलासाठी 7875760017 या मोबाईल क्रमांकावर अथवा swagatcell_nagpur@mahadiscom.in ई-मेल आयडीवर कळविण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभारसंबंधी ‘स्वागत सेल’कडे मागणी नोंदविल्यानंतर संबंधित औद्योगिक ग्राहकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, शुल्क आदींची माहिती दिल्या जाईल. दोन कार्यालयीन दिवसांत कागदपत्रांची पुर्तता, ऑनलाइन अर्ज व प्रक्रिया शुल्क भरण्याची कार्यवाही महावितरणकडून ग्राहकांच्या दारी जाऊन केली जाईल. त्यानंतर लगेचच स्थळ पाहणीच्या तांत्रिक अहवालानुसार फर्म कोटेशन देण्यासह नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु होईल. यासोबतच वीजसेवा किंवा बिलिंगच्या प्राप्त तक्रारींचे सेवेच्या कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत किंवा त्यापूर्वीच निराकरण करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.