नागपूर विभागात उत्साहात मतदान

Ø 18 व्या लोकसभेसाठी मतदारांच्या लांबच-लांब रांगा

Ø दिव्यांग व वरिष्ठ मतदारांनीही उत्साहात केले मतदान

Ø उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांनी बजावला मतदानाचा अधिकार

Ø दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान

नागपूर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज नागपूर जिल्ह्यातील पाचही लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजतापासुनच मतदारांनी हजेरी लावली होती. ठिक-ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा दिसल्या. दिव्यांग व वरिष्ठ मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

विभागातील पाचही लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले. दुपारनंतर मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडल्यामुळे मतदानाला वेग आला. मतदान केंद्रांवर महिला व युवा मतदारांची एकच गर्दी दिसून आली.

नागपूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ परिसरातील महानगरपालिकेच्या हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासमवेत आई सरिता फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांनीही मतदान केले.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रविनगर येथील मनपाच्या दादाजी धुनीवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. रविनगर परिसरातील मनपाच्या सी.पी. ॲन्ड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्नी शिवानी इटनकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मतदान केले.

नागपूर लोकसभा मतदार संघातील पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात दाभा मराठी उच्च प्राथमिक शाळेत हजारी पहाड व दाभा परिसरातील मतदारांनी सकाळी सात वाजतापासूनच मतदानासाठी लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. शंकर नगर परिसरातील सरस्वती विद्यालयात शिवाजीनगर परिसरातील मतदारांसाठी मतदान केंद्र क्र.314,315 आणि 316 उभारण्यात आले होते याठिकाणी सकाळी 9 वाजेपर्यंत मतदारांची मोठी गर्दी दिसून आली. विशेषत: 40 टक्के पेक्षा कमी दिव्यांगता असणारे दिव्यांग व्यक्ती आणि 85 वर्षापेक्षा कमी वयाच्या जेष्ठ नागरिकांची गर्दी दिसून आली. रविनगर परिसरातील मनपाच्या सी.पी. ॲन्ड बेरार शाळेतील आणि दादाजी धुनीवाले उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरही मतदारांची गर्दी दिसून आली.

असे झाले मतदान….

विभागातील गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम तसेच संवेदनशील अहेरी, आमगाव, आरमोरी, गडचिरोली या विधानसभा मतदारसंघामध्ये तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात भागात भारत निवडणूक आयोगाने सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित केली होती. या मतदारसंघात शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. जिल्हा प्रशासनातर्फे मतदानासाठी विशेष व्यवस्था केली होती.

सकाळी सात वाजतापासून पाचही मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर मतदानाला वेग आला सकाळी नऊ वाजेपर्यंत 7.32 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 19.39 टक्के, दुपारी 1 वाजेपर्यंत 32.36 टक्के तर दुपारी 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान झाले . रामटेक (अ.जा.) लोकसभा मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 40.10 टक्के, नागपूरमध्ये 38.43 टक्के, भंडारा-गोंदियामध्ये 45.88 टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये (अ.ज.) 55.79 टक्के तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात 43.48 टक्के मतदानाची नोंद झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारी ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान

Fri Apr 19 , 2024
मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे रामटेक ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ टक्के भंडारा- गोंदिया ५६.८७ टक्के गडचिरोली- चिमूर ६४.९५ टक्के आणि चंद्रपूर ५५.११ टक्के आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com