गुढी उभारली; गोंडी नृत्यावर धरला ठेका
नागपूर, दि. 22 – शहरात जी- 20 अंतर्गत सी -20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांनी आज देवलापारच्या गोविज्ञान संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी पाहुण्यांचे पारंपरिक गोंडी नृत्याने स्वागत करीत गुढी उभारण्यात आली. गोंडी नृत्यावर पाहुण्यांनीही ठेका धरला.
20 आणि 21 मार्च रोजी हॉटेल रेडिसन ब्लू येथे सी 20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपानंतर सुमारे 40 विदेशी पाहुण्यांनी आज देवलापार येथील संशोधन केंद्राला भेट देत पाहणी केली.
विविध प्रकारच्या गोविज्ञान संशोधनासाठी प्रसिध्द असलेल्या देवलापारच्या गोविज्ञान संशोधन केंद्रात पाहुण्याचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. गोंडी नृत्याचे सादरीकरण यावेळी स्थानिक कलावंतांनी केले. या नृत्यावर विदेशी पाहुण्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनीही या नृत्यावर ठेका धरला. त्यानंतर आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. दहीहंडीच्या देखाव्याचे आयोजनही केंद्रात करण्यात आले होते. परदेशी पाहुण्याना केंद्रात सुरू असलेले विविध संशोधन आणि कृषी केंद्राची माहिती दिली तसेच गोपुजनही करण्यात आले. गोविज्ञान संशोधन केंद्राच्या ‘Sovereign’ या माहिती पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार आशीष जयस्वाल, गोविज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष पदमेश गुप्ता, कार्यकारी अध्यक्ष हेमंत जांभेकर, सचिव सनतकुमार गुप्ता, सहसचिव हितेंद्र चोपकर, नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य, डॉ. परिनिता फुके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रामटेक तालुक्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून ते उत्पन्नाचा भक्कम पर्याय ठरू शकतात हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिध्द केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी तंत्रज्ञानाबाबत करार करून विविध उत्पादने तयार केली आहेत. काही उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पेटंटही मिळवण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.