विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे मुंबईत सोमवारी होणार वितरण

मुंबई :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराचे 30 ऑक्टोबरला होणार आहे. हे पुरस्कार सन 2021-22 या वर्षासाठी आहेत. मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी 5 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होईल.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री तसेच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होईल. मुंबई शहर व जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, विकास आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित राहतील.

रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्काराने भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांना गौरविण्यात येणार आहे. कामगार भूषण पुरस्कार टाटा मोटर्स लि.पिंपरी पुणे येथे इलेक्ट्रीशियन पदावर कार्यरत मोहन गोपाळ गायकवाड यांना प्रदान करण्यात येईल, तसेच 51 कामगारांचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच mahakalyan या यु ट्यूब चॅनलवर थेट प्रसारण होणार आहे.

कामगार मित्र पुरस्कारासाठी भारतीय मजदूर संघाची निवड

रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे कामगार मित्र पुरस्कार सन 2021 करिता भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात आलेली कामे विचारात घेऊन या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली आहे. अॅड.अनिल ढुमणे हे भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

कामगारांच्या कल्याणासाठी किमान २५ वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना सन २००० पासून या पुरस्काराने गौरविले जाते. रुपये ७५ हजार, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी टाटा इंजिनिअरिंग लोकोमोटिव्ह कंपनी लि. पिंपरी पुणे, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर, वनाज इंजिनिअरिंग पुणे, बजाज ऑटो लि.पुणे, घरडा केमिकल्स लि. लोटे (रत्नागिरी), मनुग्राफ इंडिया लि.शिरोली, कोल्हापूर, हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्या,) मुंबई या संस्थांना देण्यात आला आहे.

कामगार भूषण पुरस्कार

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार्थींनी पुढील आयुष्यात अधिक जोमाने कार्य सुरू ठेवावे, या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे स्वरुप रुपये ५० हजार स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.

तर,विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार हा कंपनी, आस्थापनेत काम करतानाच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कामगारांना मंडळाकडून सन १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. सन २०२३ पासून हा पुरस्कार विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार या नावाने प्रदान करण्यात येत आहे. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांमध्ये किमान ५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कामगारास या पुरस्कारासाठी अर्ज करता येतो. पुरस्काराचे स्वरुप रुपये २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे.

हा पुरस्कार आतापर्यंत डॉ. बाबा आढाव, राजा कुलकर्णी, मोहन कोतवाल, एस.आर.कुलकर्णी, डॉ.शांती पटेल, यशवंत चव्हाण, दादा सामंत, शरद राव या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, बोनस द्या - विविध मागण्यांसंदर्भात ॲड.धर्मपाल मेश्राम यांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Fri Oct 27 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सुधारित वाहन भत्ता, सातवा वेतन आयोगाची थकबाकी, दिवाळीमध्ये बोनस, महागाई भत्त्याची थकबाकी हे सर्व विनाविलंब देण्याची मागणी नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना केली आहे. नागपूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात नागपूर जिल्हा महानगरपालिका संघटनेद्वारे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com