लग्नाच्या भीतीने घर सोडल्याची रंगविली कथा

– रागाच्या भरात निघाली प्रेरणा एक्सप्रेसने

– प्रवासी अन् पोलिसांना दिली खोटी माहिती

नागपूर :- दहाव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीने घर सोडले आणि रेल्वेने पळ काढला. मात्र, गाडीतील जागरुक प्रवाशांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांना पाहताच तिने कथा रंगविली. काकू बळजबरीने लग्न लावून देत असल्याने घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी आस्थेने विचारपूस केली असता सारा प्रकार उघडकीस आला. ही घटना सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रेरणा एक्सप्रेसमध्ये घडली.

सीमा (काल्पनिक नाव) 16 वर्षाची असून ती वर्धेत मामा-मामीकडे राहते. आई वडिल जवळच्या गावात राहतात. आर्थिक स्थिती बेताची असल्याने बालपणापासून ते सीमाचा सांभाळ करतात. सीमा दहाव्या वर्गात शिकते. परीक्षात तोंडावर आल्याने अभ्यासात तिने लक्ष घालावे अशी मामीची अपेक्षा. यासाठी मामी तिला रागावली. राग मनात धरून सीमाने घर सोडण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी सकाळी ती घराबाहेर पडली. रेल्वेस्थानक गाठले आणि नागपूरच्या दिशेने जाणार्‍या गाडीत बसली. एस-2 डब्यातून ती प्रवास करीत होती. अल्पवयीन आणि एकटीच मुलगी प्रवास करीत असल्याने प्रवाशांना शंका आली. त्यांनी विचारपूस केली मात्र, ती समाधानकारक उत्तर देत नव्हती. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच जागरूक प्रवासी धर्मेश पटले आणि अल्ताफ अहमद यांनी सीमाला लोहमार्ग पोलिस ठाण्यात घेवून आले. पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांनी सीमाची विचारपूस केली असता तिने वेगळीच कथा रंगविली. समृध्दी महामार्गावरील अपघातात आई वडिलांचा मृत्यू झाला. नातेवाईक नसल्याने सध्या एकटीच राहते. मात्र, काशीद यांना संशय आला. त्यांनी आस्थेने तिची विचारपूस केली असता खरा प्रकार सांगितला. मामा-मामीला माहिती दिली. काही वेळातच ते पोलिस ठाण्यात पोहोचले. सीमाला पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. सीमाला घेवून जाताना त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

NewsToday24x7

Next Post

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत

Mon Feb 5 , 2024
*जिल्हयात 47 टक्के नागरिकांनी आयुष्यमान कार्डधारक * उदयोग वाढीसाठी विशेष प्रयत्न भंडारा :-  आयुष्यमान कार्ड काढण्यात राज्यात जिल्हा 4 थ्या क्रमांकावर असून जिल्हयात 4 लाख 79 हजार 308 म्हणजे 47 टक्के नागरिकांनी हे कार्ड काढले आहे.जिल्हयात उदयोग वाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू असुन जिल्हयाच्या सर्वागिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी आज केले. पोलीस मैदानात आयोजित मुख्य प्रजासत्ताक दिनाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com