– विजेच्या लपंडावाने दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी परिसरातील नागरिक त्रस्त.
– आणखी किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहणार महावितरण कंपनी ?
मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील हिवरखेड उपकेंद्रातील महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्व गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे हिवरखेड फिडर मधील शेतकऱ्यांना व गावातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हिवरखेड उपकेंद्रतून वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. गावात पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मोर्शी तालुक्यातील गावांना व शेती पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे खांब व तारांचे वेळोवेळी योग्य मेंटेनन्सची कामे उन्हाळयात करणे गरजेचे असतांना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही कामे न झाल्याने नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवावर बेतनाऱ्या अशा घटना मोर्शी तालुक्यात वारंवार घडत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
मोर्शी तालुक्यात दोन दिवसाआधी महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे मोर्शी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय भोजने यांच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या परिवारावर संकटाची कुऱ्हाड कोसळली असून महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे असे जीवघेणे प्रकार नागरिकांसोबत रोजच घडत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिले तरीही निष्काळजीपणे विद्युत पुरवठा करणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणखी किती जणांचे बळी घेणार? असा प्रश्न हजारो वीज ग्राहक महावितरण विभागाला विचारत आहे.
मागील ६ महिन्यांपासून दापोरी, डोंगर यावली, घोडदेव, सालबर्डी गावात विजेचा लपंडाव सुरू असून या संपूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील सिंगल फेज लाईन सुद्धा मागील काही महिण्यांपासून बंद आहे. महावितरण कंपनीच्या नियोजनाअभावी वीज ग्राहकांना रात्रभर अंधारात राहून त्रास सहन करावा लागत आहे. वीज ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. नागरिकांच्या उद्योगावर शेतकऱ्यांच्या पिकावर याचा परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक व व्यावसायिक, शेतकऱ्यांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरण कंपनीने ही गंभीर समस्या सोडवणे गरजेचे आहे.
महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हिवरखेड उपकेंद्र हजारो शेतकरी व वीज ग्राहकांसाठी समस्यांचे माहेरघर बनले आहे. शेतकरी आपल्या समस्या घेऊन जात असतांना महावितरणचे अधिकारी त्यांच्या समस्या ऐकून त्यांना कुढलेच सहकार्य करायला तयार नसल्यामुळे हजारो वीज ग्राहकांना विवीध अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन त्वरित हिवरखेड उपकेंद्रातील समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.