कोंढाळी :- केंद्र शासनाच्या आदेशानुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. यानुसार नागपूर जिल्हयामध्ये दिनांक 25 नोव्हेंबर पासून पशुगणना मोहिमेची सुरवात झाली आहे. पशुगणना 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत. प्रत्येक गावातील व शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा करणार आहेत. तरी नागरिकांनी या गणनेत सहभागी होऊन योग्य माहिती देवून सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कविता मोरे यांनी केले आहे.
सदर पशुगणनेमध्ये सर्व प्रजातीच्या पशुधन व कुक्कुट पक्षी जाती लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना ही संगणकीय प्रणालीवर होणार असल्याने सदरची पशुगणना करणेसाठी प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. जिल्हयामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पशुधन गणने साठी शहरी व ग्रामीण भागाकरीता प्रगणकांची नियुक्ती केलेली आहे.
सदर पशुगणनेमध्ये सर्व प्रजातीच्या पशुधन व कुक्कुटादी पक्षी जाती लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे.
सर्व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी गावपातळीवर पशुगणना दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत होणार असल्यामुळे पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. जेणे करून गावपातळीवरील सर्व पशुधनाची नोंद पशुगणनेमध्ये होईल. पशुगणनेपासुन कोणतेही पशुधन वंचीत राहणार नाही.
पशुगणनेत प्रगणक कुटुंब प्रमुखाचे नाव, त्यांचे शिक्षण, जनावर त्याची प्रजात, वय, लिंग, त्यांचा कोणत्या उद्देशाकरीता पालन केले जाते, त्यापासून मिळणारे उत्पादन आदी विविध माहिती संकलित केली जाणार आहे. कत्तलखाना, दररोज होणाऱ्या जनावर व पक्षीनिहाय कत्तलीची संख्या, गोशाळा, छोटे मोठे नोंदणीकृत व अनोंदणीकृत कुक्कुटपालन संस्था, मांस विक्री केंद्र तेथे रोजची जनावरे, पक्षीनिहाय कत्तल विक्री, मोकाट जनावरे, कुत्रे आदी विविध प्रकारची नोंदणी वेगवेगळ्या पध्दतीने केली जाणार आहे.
या पशुगणनेमधून प्राप्त होणारी माहिती पुढील पाच वर्षाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय व विविध योजनांकरीता अत्यंत उपयुक्त असल्याने सदर पशुगणना अत्यंत महत्वाची आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना सर्वतोपरी सहकार्य करावे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. लाडूकर तसेच कोंढाळी पशुधन चिकित्सा अधिकारी डॉ. ईरोज सोमकुवर यांनी केले आहे.