– वासुदेव झाले काळाच्या पडद्याआड,भावी पिढीला वासुदेव इंटरनेटवरच दिसतील
कामठी :- डोक्यावर मोरपिसांची निमुळती टोपी ,गळ्यात कवडयाच्या माळा, घोळदार अंगरखा, त्याखाली धोतर,कमरेला शेला त्यात रोवलेले बासरी,हातात पिवळी टाळ, चिपळ्या मुखात अखंड हरिनाम घेत ‘गाव जगवीत आली वासुदेवाची स्वारी’असे म्हणत भल्या सकाळी येऊन धर्म भावना जागरूक करीत गावोगावी होणारी वासुदेवाची स्वारी दिसेनाशी झाली असून हे वासुदेव काळाच्या पडद्याआड गेले असून भावी पिढीला तर हे वासुदेव आता इंटरनेटवरच दिसतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वीच्या काळी गावात एखादा रोग आल्यावर त्या रोगापासून कसा बचाव करायचा ,कोणती काळजी करायची असे उदभोदन वासुदेव फिरून करायचा मात्र सद्य स्थितीत वासुदेव तर दिसतच नाही इतकेच नव्हे तर गावात दवंडी देणारे सुद्धा आता कमी होत चालले आहेत.पूर्वी वासुदेवाला गावात मान मिळायचा,लोकं हातातील कामे सोडून थोडा वेळ थांबायचे त्याला दाद द्यायचे .घरातील लक्ष्मी दान देताना हात आखडता करीत नसे .गावातून तृप्त होऊन वासुदेव परतायचा त्यातून धर्म भावना जागृत व्हायची त्याचबरोबर दिवसाची सुरुवात प्रसन्न असायची सकाळच्या पहारी वासुदेव आला हो वासुदेव आला हे शब्द कानी पडले की अंगणात महिला वासुदेवाच्या झोळीत पसाभर दान टाकायच्या .हेच दान घेऊन मग लहान मोठ्यांचे कौतुक वासुदेवाच्या तोंडून होत असल्याने क्षणभर कौतुक वाटायचे आणि मोठ्या मनाने वासुदेवाला स्वेच्छेने दान द्यायचे मात्र आता ही परिस्थिती बदलली असून गावागावात दिसणारा वासुदेव आता दिसेनासा झाला आहे.