ग्रामीण जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामविकासाची नितांत गरज..!  – भास्कर पेरे पाटील  

• काटोल-नरखेड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिव यांच्यासाठी ग्रामविकास कार्यशाळा संपन्न.

• माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

• डॉ. आशिष र. देशमुख लिखित ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ या ग्रंथाचे प्रकाशन.

काटोल :-“गावकऱ्यांना सांभाळणे ही तारेवरची कसरत आहे. सगळा भार सरपंचावर असतो. गावकऱ्यांना काय हवं, काय नको याचं भान सरपंचाला ठेवावं लागतं. ग्रामपंचायतीचे उत्पन्न कसे वाढवायचे, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम अशा अनेक गोष्टी सरपंचाला बघाव्या लागतात. सरपंचाने ग्रामपंचायतीमधील मिटींगला सर्व विभागाचे कर्मचारी बोलवावे, अगदी बारीक-सारीक समस्या बारकाव्याने हाताळाव्यात. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री आहे आणि ग्रामसेवक हा गावाचा मुख्य सचिव आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी या दोघांचे ऐकलेच पाहिजे, मीटिंगला आलेच पाहिजे. ग्रामसेवक हा गावासाठी महत्वाचा घटक आहे. लोकांनी समस्या सांगण्यापेक्षा स्वतः समस्यांपर्यंत पोहोचावे. विरोधक असले तरी त्यांना गावातील विकासकार्यात गुंतवावे. नफा-तोटा बघून उचित निर्णय घ्यावे. लोकसहभागातून ग्रामविकास सहज शक्य आहे. रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी, स्वच्छता, शौचालय, वृक्षारोपण, आरोग्य अशा अनेक कामांसाठी आर्थिक नीती आखावी लागेल. ग्रामपंचायतीची आवक कमी असते पण खर्च फार जास्त असतो. याची सांगड घालावी लागेल. आदर्श गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, जमिनीत पाणी जिरवणे, पर्यावरण, शासकीय योजना यासाठी निकष तयार करावेत. शासकीय योजनांचा उपयोग व्यवस्थित केला पाहिजे. आपले काम सोपे कसे होईल, यासाठी वरच्या पातळीवर चांगले संबंध जपावे. सर्वकाही शक्य आहे, त्यासाठी वेळ द्यावा लागेल. ग्रामीण जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामविकासाची नितांत गरज आहे. ग्राम विकासाचा रस्ता कठीण आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकाराने कामे करावी लागतात. समाजाच्या कल्याणासाठी शासनाचा जीआर पाळला नाही तरी चालेल. ग्रामपंचायतीने गावाला पिण्याचे स्वच्छ पाणी द्यावे, फळांचे भरपूर झाडे लावावीत (कमीत कमी ४ प्रतिव्यक्ती), स्वच्छता, शिक्षण, वृद्धांना दत्तक घेऊन सांभाळावे. चांगल्या सरपंचाला गावातील समस्या आपोआप दिसतात, त्यावर तो नक्कीच तोडगा काढू शकतो. ग्राम पंचायत काहीही करू शकते. मृतकाची राख खड्डा करून तिथे झाड लावल्यास पर्यावरण चांगले राहील. स्वत:मधील ताकद ओळखा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. रासायनिक खतांपासून दूर राहा. साधे पाणी, पिण्याचे पाणी, RO पाणी, गरम पाणी अशी व्यवस्था मी ग्रामपंचायतीकडून गावात करून ठेवली आहे. पुढाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यात काही मोठे केले तर त्याचा फायदा लोकांनाच होईल, त्यांचे कल्याण होईल. समाजासाठी काहीतरी करावे. ग्रामपंचायतीचा जेव्हडा खर्च आहे, त्यापेक्षा २० टक्के जास्त पैसे लोकांकडून कराद्वारे गोळा व्हायला पाहीजे. लोकांची नाडी ओळखा, त्यांना पूरक मदत करा. सरकार योजना दाखवतात, प्रत्यक्षात देत नाहीत. शौचालय बांधण्यातसुद्धा भ्रष्टाचार होतो, ही खेदाची बाब आहे. ग्रामसेवक महत्वाचा घटक आहे, त्यांना हाताशी धरा. ग्रामसेवकाशिवाय गावात योजना राबविता येत नाही. आर्थिक नियोजन करावे. ग्राम पंचायतीला घटनेने चिन्ह आणि पक्ष दिला नाही, त्यामुळे ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय सहज घेता येतात”, असे प्रतिपादन ग्राम विकासाचे जनक भास्कर पेरे पाटील यांनी केले. काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिव यांच्यासाठी दि. १० मार्चला ग्रामविकास कार्यशाळेचे आयोजन अरविंद सहकारी बँक सभागृह, काटोल येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून ग्रामविकासाचे जनक भास्कर पेरे पाटील, पाटोदा, जि. औरंगाबाद हे उपस्थित होते. त्या प्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि उपयुक्त मार्गदर्शन केले.

कृष्णाजी तिडके (क्षेत्रीय सह-संचालक, नियोजन विभाग, नागपूर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रणजितबाबु देशमुख (माजी ग्रामविकासमंत्री, महाराष्ट्र) यांनी कार्यशाळेचे अध्यक्षपद भूषविले. या कार्यशाळेचे आयोजक माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी लिहिलेल्या ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ या ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाच्या डिजिटल आवृत्तीचेसुद्धा यावेळी प्रकाशन करण्यात आले.

“महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांनी समाजाचे भले केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण स्वत:ला वाहून घेतले पाहिजे. गावाचा विकास व्हावा तसेच शेती, गुरे-ढोरे, पांदन रस्ते, आरोग्य, व्यसनाधीनता यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी काहीतरी मोठे करावे. आपण आमदार असतांना पांदन रस्त्यांसाठी भरपूर पैसा दिला, जलयुक्त शिवारासाठी कामे केलीत. काटोल-नरखेड क्षेत्र कॅन्सरमुक्त व्हावे, म्हणून हजारो लोकांपर्यंत पोहोचलो. त्यांचे उपचार केले. सरपंचांनी त्यांच्या कारकिर्दीत लोकसहभागातून गावांचा विकास करावा. रणजीत देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री असतांना त्यांच्या काळात भरीव कार्य केले. गुणवत्ता कामाचा मूलमंत्र त्यांनी दिली. महिलांसाठी ५०% टक्के आरक्षण त्यांच्या काळात आले. ग्रामविकासाचे जनक भास्कर पेरे पाटील यांना मी आश्वासित करतो की, आम्ही ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास करू. लोकसहभागातून ग्रामीण विकासाला वाहिलेल्या माझ्या ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे, याचा आनंद आहे. अभ्यासपूर्वक लिहिलेल्या या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करता येणार आहे. सर्वपरीने विकासाचा मंत्र या ग्रंथात दिला असून काटोल-नरखेड क्षेत्रातील ग्रामविकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. ग्रामीण भागाच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामस्थांनी विकासाची कास धरावी. आदर्श गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, उघड्यावर शौच्यमुक्तता अशा अनेक विषयांवरील भास्कर पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनातूनसुद्धा ग्रामविकास साधायचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनात काटोल आणि नरखेड तालुक्यातील आदर्श गावांच्या निर्मितीसाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे. परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसचिव / ग्रामसेवक यांचे विकासकार्यात योगदान महत्वाचे असून त्यांना यानिमित्याने संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे”, असे प्रतिपादन डॉ. आशिष र. देशमुख यांनी यावेळी केले.

कृष्णाजी तिडके यांनी ग्रामविकासासंबंधी यावेळी आपले मत मांडले. भास्कर पेरे पाटील यांच्या तसेच डॉ. आशिष र. देशमुख लिखित ‘ग्रामविकासाचा पासवर्ड’ या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रामविकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.  रणजीत देशमुख यांनी उज्ज्वल भविष्यासाठी ग्रामविकासाची गरज विषद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यशाळेला काटोल तालुक्यातील ८३, नरखेड तालुक्यातील ७३, बाजारगाव भागातील १२ सरपंच, उपसरपंच, ग्रामसचिव / ग्रामसेवक तसेच परिसरातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. उत्कृष्ट सरपंचांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

भास्कर पेरे पाटील सरपंच असताना पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. पहिल्यांदा तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि दुसऱ्या वेळेला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हातून त्यांचा सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारकडूनही त्यांना पुरस्कार मिळाला होता. पाटोदा गाव शंभर टक्के उघड्यावर शौच्यमुक्त आहे. पेरे यांच्या कारकिर्दीत गावामध्ये झाडे लावली गेली आणि गावाला हरित केले गेले. भास्कर पेरे पाटील पाटोदा ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या पदांवर राहिलेले आहेत. आदर्श गाव कसे असावे, ग्रामस्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी अशा अनेक विषयांवर ते मार्गदर्शनसुद्धा करतात. त्यांच्या मार्गदर्शन काटोल आणि नरखेड तालुक्यातील आदर्श गावांच्या निर्मितीसाठी ही कार्यशाळा माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख, कार्यकारी अध्यक्ष अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठान, नागपूर यांनी काटोल-नरखेड क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक / ग्रामसचिवांसाठी आयोजित केली होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधानांनी कर्नाटकातील म्हैसूर येथे ‘प्रोजेक्ट टायगरच्या 50 व्या वर्षपूर्ती’निमित्त आयोजित कार्यक्रमाचे केले उद्घाटन

Mon Apr 10 , 2023
आंतरराष्ट्रीय मार्जार कुळातील वन्यप्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा केला शुभारंभ भारतात वाघांची संख्या 3167 असल्याचे केले घोषित. व्याघ्र संवर्धनाशी संबंधित विशेष नाणे आणि विविध लिखीत साहित्याचे केले प्रकाशन “व्याघ्र प्रकल्पाचे यश हा केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी अभिमानाचा क्षण आहे” भारत पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संघर्षावर विश्वास न ठेवता या दोन्हीच्या सहअस्तित्वाला समान महत्त्व देतो. “भारत हा असा देश आहे जिथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!