– विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते “नागपूर सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन” अहवालाचे अनावरण करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आयोजित छोटेखानी समारंभात मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, उप अभियंता गजेंद्र तारापुरे, प्रमोद भस्मे, कनिष्ठ अभियंता प्रशांत काळबांडे, परिवहन विभागाचे परिवहन प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, विलास जोशी यांच्यासह आरएमआयचे सल्लागार प्रथमेश मोडक, स्वप्नील फुलारी प्रामुख्याने उपस्थित होते.
वाढत्या वाहनांमुळे होणारे हवेचेप्रदूषण कमी करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक अशा विद्युत वाहनांना प्रोत्साहनदेण्यासाठी नागपूर महानगरपालिका येथे विशेष ईव्ही सेलची स्थापना करण्यात आली आहे. ईव्ही सेलच्या माध्यमातून विद्युतवाहनांसाठी पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी नागपूर सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन तयार करण्यात आला आहे. याद्वारे नागपूर शहरासाठी येत्या वर्ष २०२७ पर्यंत ४० टक्के नवीन ईव्ही वाहन नोंदणीचा मानस आहे. ईव्ही सेलद्वारे घेण्यात आलेल्या “सिटी ईव्ही एक्सीलरेटर” कार्यशाळेत ७० हून अधिक भागधारकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांच्या आधारावर “सिटी ईव्ही रेडिनेस प्लॅन तयार करण्यात आला आहे.
प्रथम ते शेवट पर्यतची कनेक्टिव्हिटी, चार्जिंग आणि बॅटरी-स्वॅपिंग पायाभूत सुविधा, आणि सार्वजनिक वाहतूक विद्युतीकरण या तीन प्रमुख विषयांवर हा ईव्ही रेडिनेस प्लॅन आधारित असून, याद्वारे मनपाच्या विविध विभागांना ईव्ही-सक्षम भविष्यासाठी एकत्र काम करण्यास मदत करेल.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात नागपूर शहरात विद्युत वाहनांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून शहराला विद्युत वाहनांच्या वापरासाठी संपूर्णतः सज्ज करण्याच्या उद्देश निर्धारित करण्यात आले आहे.