शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा…
मुंबई :- राज्यातील एक – एक प्रकल्प राज्याबाहेर जात असून ते थांबवण्यात शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे – फडणवीस सरकारला काहीच येत नाही अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
वेदांत फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवल्यानंतर आता आणखी एक ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये गेला असून महेश तपासे यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर एक – एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा सुरू झाला आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्कड्रग पार्क आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा देखील प्रकल्प राज्याबाहेर जात आहे. हे सर्व प्रकल्प थांबवण्यामध्ये शिंदे – फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.
राज्यात रोजगार कसा निर्माण करणार याचं उत्तर मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांच्याकडे सध्यातरी नाही. राज्याला औद्योगिक विकास वाटेवर कसे आणणार आणि नवीन प्रकल्प राज्याबाहेर का गेला याचंही उत्तर शिंदे – फडणवीस यांनी जनतेला द्यायला हवे अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.