संदीप बलविर,तालुका प्रतिनिधी
तस्करांचे संबंधित विभागांसी साटेलोटे
बिट प्रभारी वसुलतात लाखोंची एन्ट्री,विश्वसनिय सूत्रांची माहिती
नागपूर :- वाळू तथा गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीवर प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाकडून संबंधित अधिनीयमात वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेली असली तरी शासनाच्या याच अधिनियमांना केराची टोपली दाखवून सर्रासपणे वाळू तस्करी मध्ये तालुक्यात अव्वल दर्जाचे स्थान प्राप्त करण्याचे कार्य आदर्श ग्राम पुरस्कृत बेला-सोनेगाव परिसरात सुरू असल्याचे चित्र असून या सर्व अवैध कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या संपूर्ण यंत्रणा कायम अपयशी ठरत आहेत.त्यामुळे परिसरातील सर्रासपणे सुरू असलेल्या या वाळू तस्करीला नेमके अभय तरी कुणाचे असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
तालुक्यातील बेला गावाला आदर्श ग्राम चा पुरस्कार मिळविण्यासाठी येथील सामाजिक संघटनांनी अहोरात्र प्रयत्न केले आहे याची जाण सर्वांनाच आहे.परंतु या गावाला मिळालेला आदर्शाचा ठसा हा आता इतिहासजमा होतांनाचे चिन्ह दिसून येत आहे.या मागच वास्तव हे किती भयावह आहे हे येथील अवैध धंद्याच्या पडद्यामागील रहष्याने उघडकीस येत आहे.जवळपास स्थानिक १५ हजाराच्या लोकसंख्येच्या बेला या गावाची कायदा व सुव्यवस्था सांभाळत असतांना येथील पोलीस प्रशासनावर माहितीनुसार ६३ गावांसह विनानोंदीच्या ५ अश्या ६८ गावांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.या गावांच्या सुरक्षेकरिता बेला,पिपरा आणि रामा असे ३ बिट मिळून सिरसी या ठिकाणी एक पोलीस चौकी आहे.नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बेला परिसरात मागील काही काळापासून अवैध धंद्यांना चांगलेच उधाण आले असल्याच्या चर्चा आहे.त्यात परिसरातील वेना नदी पात्रातून होत असलेली वाळू तस्करी ही सर्वाना मागे टाकून अव्वल ठरत असल्याचेही बोलले जात आहे.यात येथील प्रशासनाच्या बिट प्रभाऱ्यांसी वाळू तस्करांचे आर्थिक साटेलोटे असल्याने संपूर्ण अवैध कारभाराला अभय मिळत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांची आहे.या सर्व अवैध कारभारात शासनाच्या महसुलाचे नुकसान तर होतच आहे शिवाय पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत असल्याने निसर्गप्रेमीकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रक्षकच बनले भक्षक?
महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ मधील कलम ४७ (७) अन्वये उत्खनन व वाहतूक केलेल्या गौण खनिजांच्या बाजार मूल्यांच्या ५ पटीने दंड वसूल करण्याची तरतूद केलेली आहे.तसेच कलम ४८ (८) नुसार गौण खनिजांच्या अवैध उत्खननासाठी तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली संपूर्ण यंत्र सामुग्री तथा वाहने जप्त करण्याची देखील तरतूद यात समाविष्ट आहे.मात्र वाळू तस्करांना स्थानिक बिट प्रभाऱ्यांना ‘एन्ट्री’ देण्याची या परिसरात परंपरा असल्याने या संपूर्ण कारभाराला ‘ग्रीन सिग्नल’ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून येथे नेमण्यात आलेले रक्षकच भक्षक बनले आहे त्यामुळे याकडे आता संबंधित प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत येथील सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.
विशेष बाब अशी की,दोन दिवसांपूर्वीच बेला पोलीस स्टेशन अंतर्गत आष्टा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून झुडपात लपवून ठेवल्याचे सुज्ञ नागरिकांच्या दक्षतेमुळे उघडकीस आले.जर त्या नागरिकांनी याकडे दुर्लक्ष केले असते तर चोरांनी रात्रीच्या अंधारात लाखो रुपयांची वाळू लंपास केली असती हे मात्र नक्की! तरी वाळू तस्करीला लगाम लावण्याकरिता उच्च अधिकाऱ्यांनी कनिष्ठांच्या कान पिचक्या घेणे गरजेचे आहे.नाहीतर हे शासनाच्या करोडो रुपयांच्या संपत्तीला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही.
@फाईल फोटो