केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण 

– शिस्तपालन करणाऱ्या वाहनचालकांना मिळणार ३५ कोटींची बक्षिसे

नागपूर :- वाहतुकीच्या दृष्टीने नियम अत्यंत महत्त्वाचे असतात, याच नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून ट्रॅफिक रिवॉर्ड्स नावाचा एक अभिनव पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲपचे लोकार्पण करण्यात आले. हे देशातील प्रथमच ट्रॅफिक रिवॉर्ड्स ॲप आहे. नागरिकासाठी ॲपद्वारे ३५ कोटी रुपयांचे ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमात नागपूर महागरपालिककेचे आयुक तथा प्रशासक राधाकृष्णन बी., व्हीएनआयटीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पडोळे, मनपाचे उपायुक्त रविंद्र भेलावे, मनपाच्या विद्युतविभागाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांच्यासह शहारातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील नागरिक जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचे पालन करतील तेव्हा त्यांना या अँपच्या माध्यमातून रिवॉर्ड पॉइंटस देण्यात येतील. शंभराहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक ब्रँड्समधून रिवॉर्ड घेण्यासाठी हे पॉइंट वापरले जाऊ शकतील. या प्रकल्पाला भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी देण्यात आला आहे.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, हा प्रकल्प नागपूर महानगरपालिकेने अत्यंत उत्तमरीत्या हाताळला असून याचे अनुकरण संपूर्ण देशभरात केल्या जाईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे वाहनांच्या अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या शिस्तप्रिय नागरिकांना रिवॉर्ड दिल्या जाणार असल्याने वाहन चालकांना नियम पालन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. असे सांगत गडकरी यांनी नागपूर महानगपालिकेच्या कार्याचे कौतुक केले. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांनी या नाविन्यपूर्ण कल्पनेला नागरिकांनी देखिल उत्तम साथ दिल्याबद्दल अभिनंदन केले. याशिवाय अशा प्रकारचे प्रकल्प राबविणारे नागपूर देशातील प्रथम शहर असल्याचा अभिमान देखील व्यक्त केला.

सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर गौतम यांनी आपल्या प्रास्ताविकेतून संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत जवळपास एक लाख ट्रॅफिक रिवॉर्ड्स टॅगचे वितरण वाहनचालकांना करण्यात येणार आहे. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना ट्रॅफिकरिवॉर्ड्सचा (TrafficRewards) टॅग त्यांच्या घरी मोफत दिला जाईल. सध्या ही यंत्रणा नागपुरात १० सिग्नलवर लावण्यात आलेली आहे . काही आकर्षक बक्षिसांमध्ये बीपीसीएल पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल, बजाज अलायन्झकडून विमा प्रीमियमवर सूट आणि विविध ब्रँडवरील इतर आकर्षक ऑफर्स यांचा समावेश आहे. या ॲपवर सध्या ३५ कोटी रुपयांच्या ऑफर्स उपलब्ध आहेत. हा प्रकल्प सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स प्रा.लि.तर्फे राबविण्यात आला असून व्हीएनआयटी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे.

कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते सेवाप्रसाद रेड्डी, पंकज जैन, यतीम आशिष मिश्रा, यशदीप माने, राईस सन डिसूजा डॉ. प्रकाश खेतान,तुषार गावड,मोहम्मद परवेज,आर एन पात्रीकर, आर बी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

असा वापरता येणार

रिवॉर्ड्स मिळविण्यासाठी वापरकर्त्याला गूगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर वरून ट्रॅफिकरिवॉर्ड्स (TrafficRewards)ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांचे तपशील नोंदवावे लागतील. जेव्हा हा टॅग असलेले वाहन लाल सिग्नलवर थांबेल, तेव्हा तेथील RFID स्कॅनर आपोआप या टॅग ला स्कॅन करेल व नियम पाळणाऱ्या वाहन चालकाला त्याच्या अँपमध्ये १० पॉइंटस मिळतील. अशाप्रकारे, प्रत्येक वेळी वापरकर्त्याने सिग्नलचे पालन केल्यावर पॉइंटस मिळतील. हे गोळा केलेले पॉइंट बीपीसीएल, बजाज अलायन्झ, पिझ्झा हट, केएफसी, किंगस्वे हॉस्पिटल, सिनेपोलीस, ॲलेक्सिस हॉस्पिटल इत्यादी १०० हुन ब्रँड सोबत रिडीम केले जाऊ शकतात. तरी नोंदणी करण्यासाठी, नागरिक ( www.trafficrewards.in) या संकेत स्थळाला भेट देऊ शकतात किंवा 7879066066 या क्रमांकावर Missed कॉल देऊ शकतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुरण विकासात लोकसहभाग वाढावा – अजय पाटील 

Sun Jun 4 , 2023
नागपूर :-गवती कुरण ही महत्‍वाची परिसंस्‍था असून प्राणीमात्रांच्‍या अन्‍नसाखळीचा महत्‍वाचा भाग आहेत. पर्यावरणाचा –-हास थांबवायचा असेल, पृथ्‍वीला वाचावायचे असेल कुरणांचा मोठ्या प्रमाणात विकास होणे गरजेचे असून त्‍यासाठी लोकसहभाग महत्‍वाचा आहे, असे मत महाराष्‍ट्र राज्‍य वनसंरक्षक व पदोन्‍नत वनपाल संघटना नागपूरचे अध्‍यक्ष अजय पाटील यांनी व्‍यक्‍त केले. वनराई फाउंडेशन नागपूरतर्फे ‘संरक्षित वनक्षेत्रात कुरण विकास व्‍यवस्‍थापन’ विषयावर अजय पाटील यांचे रविवारी व्‍याख्‍यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!