– ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या ‘डबल डेकर’ ग्रीन बसचे लोकार्पण
नागपूर :- ज्येष्ठ नागरिकांकडे कुटुंबीयांना पाहिजे तसे लक्ष देता येत नाही. बरेचदा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे एकाकीपणाची भावना ज्येष्ठांमध्ये निर्माण होते. अशा परिस्थितीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान करीत आहे. धार्मिक स्थळांची व पर्यटन स्थळांची सहल हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी (शनिवार) केले.
अशोक ले-लँड आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डबल डेकर’ इलेक्ट्रीक बसचा (ग्रीन बस) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांच्यासह स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू, अशोक ले-लँड लिमिटेडचे उपाध्यक्ष (कार्पोरेट अफेअर्स) यश सच्चर, पश्चिम व मध्य झोनचे प्रमुख ए. के. सिन्हा यांनी ग्रीन बसला हिरवी झेंडी दाखवली. अशोक ले-लँड कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत ही बस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला दिली आहे.
या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार नाना श्यामकुळे, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, माजी महापौर नंदा जिचकार, संजय भेंडे, प्रभाकर येवले, कमलेश राठी, प्रतापसिंह चव्हाण, राजाभाऊ लोखंडे, डॉ. संजय उगेमुगे, जयप्रकाश गुप्ता यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘सध्या ज्येष्ठ नागरिक मंडळाकडे एक इलेक्ट्रीक बस आहे. आतापर्यंत हजारो ज्येष्ठ नागरिकांनी शेगाव, माहूर, कळंब, आंभोरा, आदासा, धापेवाडा आदी धार्मिक स्थळांच्या नि:शुल्क सहलीचा लाभ घेतला आहे. आता अशोक ले-लँड कंपनीच्या आणखी एका बसची भर पडली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही बसेस उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.’ सध्या शेगावपर्यंत या दोन्ही बस जाणार आहेत, पण भविष्यात शिर्डीपर्यंत प्रवास घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. नवीन डबल डेकर बसमध्ये साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून सहलीला जाताना ज्येष्ठ मंडळी भजनांचा, गाण्यांचा आस्वाद घेऊ शकतील, असेही ना. गडकरी म्हणाले. स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू यांनी ना. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच डबल डेकर इलेक्ट्रिक बस भारतात सुरू करू शकल्याचे सांगितले. ना. गडकरी यांनी लंडनमध्ये ही बस बघितली होती. त्यानंतर त्यांनी अशीच बस आपल्याकडेही सुरू व्हायला हवी, असा आग्रह धरला. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या विशेष बस आम्हाला उपलब्ध करता आल्या आहेत, असेही महेश बाबू म्हणाले. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांनी प्रास्ताविकातून प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले तर आभार प्रा. अनिल सोले यांनी मानले.
‘सकारात्मकता सर्वांत मोठे औषध’
ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा वाटू नये यासाठी एक विरंगुळा केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून विविध उपक्रमांमध्ये ते गुंतून राहतील. त्यांचा आत्मविश्वास जेवढा वाढेल, त्यांच्यातील सकारात्मकता जेवढी वाढेल, तेवढे त्यांचे आरोग्य चांगले राहील. कारण सकारात्मकता आणि आत्मविश्वास हे सर्वांत मोठे औषध आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.
दत्ता मेघे यांच्याकडून पाच लाखांची मदत
ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे यांनी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या उपक्रमांसाठी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. ते म्हणाले, ‘गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका चांगल्या कार्यासाठी सहकार्य करीत असल्याचे समाधान आहे. ही संधी आपल्याला ना. श्री. नितीन गडकरी यांनी उपलब्ध करून दिली, ही अतिशय आनंदाची बाब आहे.’ नितीनजींसारखी व्यक्ती आपल्या शहराला लाभली आहे, हे आपले भाग्य आहे. ते जे काम करीत आहेत, ते मानव जातीच्या कल्याणाचे आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
‘डबल डेकर’ बसचे वैशिष्ट्य
अशोक ले-लँड कंपनीची ही डबल डेकर ग्रीन बस वातानुकुलित असून यात ६५ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. अत्याधुनिक लिथियम-आयन बॅटरीवर चालणारी ही बस दीड ते तीन तासाच्या एका चार्जिंगमध्ये २५० किमी धावू शकते. या डबल डेकर बसची उंची ४.७५ मीटर असून लांबी ९.८ मीटर आणि रुंदी२.६ मीटर आहे.