– प्रस्तावित व्यापारी संकुलाचे प्रेझेंटेशन : सूचना पाठविण्याचे आवाहन
नागपूर :- गणेशपेठ येथील प्रस्तावित वस्त्रोद्योग संकुलाच्या (टेक्स्टाईल कॉम्प्लेक्स) संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) नागपुरातील व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली. या संकुलाच्या संदर्भात व्यापाऱ्यांना सूचना मागविण्यात आल्या आहेत.
म्हाडाच्या वतीने रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये संकुलाच्या संकल्पचित्राचे प्रेझेंटेशन देण्यात आले. यावेळी ना. नितीन गडकरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडा नागपूरचे सीईओ मेघमारे, बांधकाम व्यवसायिक बी.जी. शिर्के आदींची प्रमुख उपस्थिती होती. गिता मंदिरच्या पुढे एम्प्रेस मीलच्या जागेवर वस्त्रोद्योग संकुल (टेक्स्टाईल कॉम्प्लेक्स) प्रस्तावित आहे. १४ लाख चौरस फुटाच्या जागेवर एक असे व्यापारी संकुल असेल ज्याठिकाणी केवळ कपड्यांची बाजारपेठ असेल. याठिकाणी मोठ्या व किरकोळ व्यापाऱ्यांनाही सामावून घेण्यात येईल.
नागपुरातील सर्व कपडा व्यापारी एका ठिकाणी आले तर ग्राहकांचीही सोय होईल. यासोबतच बाजारातील रस्त्यांवर होणारी वर्दळ कमी करता येईल, असे ना. गडकरी म्हणाले. वस्त्रोद्योग व केवळ त्याच्याशीच संबंधित सर्व छोट्या उद्योगांना या संकुलात सामावून घेण्यात येणार आहे. महिला व पुरुष अशा दोन गटात संकुलाची विभागणी करण्यात येणार आहे. सुसज्ज व पुरेशी पार्किंग व्यवस्था या संकुलाचे वैशिष्ट्य असणार आहे. एक्सेलेटर्स, लिफ्ट्स, अद्ययावत प्रसाधने या सुविधांचाही यामध्ये समावेश असेल. ना.गडकरी यांनी व्यापाऱ्यांच्या सोयीने संकुलाची रचना करण्याच्या सूचना म्हाडाला दिल्या. यावेळी नागपुरातील व्यापाऱ्यांनी काही अपेक्षाही व्यक्त केल्या. त्यावर बोलताना ना. गडकरी यांनी सर्व वस्त्रोद्योग व्यापाऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या सूचना कळवाव्या, असे आवाहन केले.