मुंबईतील मूक पशु-पक्षांच्या सेवेत ११ सुसज्ज पशुवैद्यकीय ऍम्ब्युलन्स रुजू  

राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत पशुपक्षी रुग्णवाहिकांचे राजभवन येथून लोकार्पण

मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व केंद्रीय पशुपालन, मत्स्यव्यवसाय व डेअरी मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबई व आसपासच्या परिसरातील मूक पशु-पक्षांच्या सेवेसाठी ११ पशुवैद्यकीय रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. समस्त महाजन ट्रस्ट या संस्थेच्या पुढाकाराने या पशुवैद्यकीय रुग्णवाहिकांना राजभवन येथून झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन व महिला – बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार गीता जैन, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, समस्त महाजन ट्रस्टचे विश्वस्त व केंद्रीय प्राणी मंडळाचे सदस्य गिरीश शहा, नितीन वोरा तसेच विविध जैन संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतीय तत्वज्ञानामध्ये प्राणिमात्रांप्रती दया व करुणेला महत्व देण्यात आले आहे. ‘वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाणे रे’ या भजनाच्या माध्यमातून दुसऱ्याच्या दुःखाबाबत संवेदनशील राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. पशुपक्षांचे कल्याण प्रत्येक भारतीयाच्या रक्तात भिनले आहे असे सांगताना स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाने आर्थिक, सामाजिक व आरोग्य दृष्टीने शक्तिशाली होताना प्राणिमात्रांच्या कल्याणाचा देखील विचार केला पाहिजे असे राज्यपाल यांनी यावेळी बोलताना सांगितले.     

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात पशुपक्षांच्या उपचाराकरिता ५००० ऍम्ब्युलन्स सुरु करण्यात आल्या असून सर्व पशुसंपदेचे मोफत लसीकरण करण्यात आले असल्याचे केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी यावेळी सांगितले. माणसाच्या डॉक्टरांपेक्षा पशुवैद्यकांचे काम कठीण असते त्यामुळे पशुवैद्यकांचा समाजात अधिक मानसन्मान झाला पाहिजे असे रुपाला यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील कास पठार येथे केवळ पशु – पक्ष्यांच्या विहारामुळे रंगीबिरंगी फुले फुलतात व ती फुले पाहण्यास जगभरातून पर्यटक येतात. त्यामुळे जीवसृष्टीमध्ये पशु पक्षांचे फार मोठे महत्व आहे असे सांगताना ‘समस्त महाजन’ संस्थेच्या माध्यमातून पशुपक्ष्यांकरिता देशात कोठेही झाले नाही इतके मोठे कार्य झाले आहे असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. 

पशुवैद्यकीय ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून दरवर्षी ३६००० जखमी – आजारी पशुपक्षांना जीवनदान देण्यात येईल तसेच मोठ्या प्राण्यांचे जागेवरच उपचार करण्यात येतील असे समस्त महाजन संस्थेचे विश्वस्त गिरीश शहा यांनी सांगितले. मुंबईजवळ लवकरच मोठी प्राणिशाला उभारण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या पशु रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित पशुवैद्यक असेल तसेच शस्त्रक्रिया कक्ष, भूल देण्याची सोय, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन काँसंट्रेटर, रेफ्रिजरेटर, गिझर व अग्निशमन सामग्री उपलब्ध असेल. अपघातात जखमी झालेल्या लहान प्राण्यांवर व पक्ष्यांवर रुग्णवाहिकेमध्ये लगेचच उपचार व शस्त्रक्रिया करता येतील असे गिरीश शहा यांनी सांगितले.

या ऍम्ब्युलन्स वसई विरार, दहिसर ते मालाड, गोरेगाव ते जुहू पार्ले, बांद्रा -खार – सांताक्रूझ, दादर, दक्षिण मुंबई, सायं ते मुलुंड, ठाणे, भिवंडी व नवी मुंबई या परिसरात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com