स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम
नागपूर :– स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते (रविवार) रुग्णांना कर्णयंत्रांचे निःशुल्क वाटप करण्यात आले.
संस्थेच्या वतीने १ ते ३० जून या कालावधीत नागपूरच्या विविध भागांमध्ये आयोजित ३४ शिबिरांमध्ये १७० रुग्णांची कर्णदोष तपासणी करण्यात आली. यातील ३७ लोकांना कर्णयंत्र देण्यात येणार आहे. ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते आज प्रातिनिधिक स्वरुपात ५ रुग्णांना कर्णयंत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ५ हजार ३४० लोकांची नेत्रतपासणी झाली असून यातील दोन हजार नागरिकांना अत्यल्प दरात चश्मा देण्यात आला आहे. तर ९० लोकांवर निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून मोबाईल एम्बुलन्सच्या माध्यमाने संपूर्ण नागपुरात नेत्र व कर्णदोष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. ना. गडकरी यांच्या हस्ते चंदू डवले, नलिनी फरकाडे, उषा चंदनवार, आनंदराव चंदनकर आणि पुरुषोत्तम नागोर यांना कर्णयंत्र देण्यात आले. ना. गडकरी यांनी सर्वांना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे राजू मिश्रा, चंद्रकांत खंगार, संगीता नाईक, सुनील नांदुरकर आदींची उपस्थिती होती. नेत्र व कर्णदोष तपासणी शिबिरासाठी भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, शिबिर संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे, विलास सपकाळ, डॉ. गिरीश चरडे, डॉ. अजय सारंगपुरे, प्रफुल शिंदे, डॉ. संजय लहाने आदी मंडळी कार्यरत आहेत.