नागपूर होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

– सिंदी रेल्वे येथील मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन

– रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीला हिरवी झेंडी

नागपूर :- सिंदी रेल्वे हा भौगोलिकदृष्ट्या वर्धा जिल्ह्याचा भाग असला तरी त्याला नागपूरपेक्षा वेगळे मानत नाही. त्यामुळे नागपूरमधील उद्योगांना सिंदी ड्राय पोर्टशी जोडून मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येत्या काळात नागपूर हे देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’ म्हणून नावारुपाला आलेले असेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला.

सिंदी रेल्वे येथे बहुप्रतीक्षित अशा मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्कचे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी सिंदी रेल्वे टर्मिनल सेवेच्या चाचणीलाही त्यांनी हिरवी झेंडी दाखवली. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असा हा प्रकल्प आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएमएल) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे (जेएनपीटी) अध्यक्ष उन्मेष वाघ, एनएचएलएमएलचे संचालक के. सत्यनाथन आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी यांनी सिंदी येथील ड्रायपोर्टचा शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘आज विदर्भाच्या शेतातील उत्पादन किंवा याठिकाणी तयार होणाऱ्या वस्तुंची बांगलादेशमध्ये निर्यात करायची असेल तर रेल्वेने मुंबईला पाठवून तेथून समुद्रामार्गे श्रीलंका व श्रीलंकेतून बांगलादेशला पाठवावे लागते. आता या लॉजिस्टिक पार्कमधून रेल्वेमार्गे थेट हल्दिया (प.बंगाल) आणि तेथून बांगलादेशला आपला माल निर्यात करता येणार आहे.

नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग देखील येथून जवळ आहे. ड्राय पोर्टमुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.’ निर्यात करणाऱ्या उद्योगांचे क्लस्टर याठिकाणी तयार होणार असल्याचेही ना. श्री. गडकरी म्हणाले. ड्रायपोर्टसाठी एक सल्लागार मंडळ नेमण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या. यामध्ये प्रकल्पातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती व लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यासही त्यांनी सांगितले. खासदार रामदास तडस म्हणाले की, ‘२०१४ पूर्वी वर्धेमध्ये केवळ १६० किलोमीटर लांबीचे रस्ते होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अवघ्या दहा वर्षांत संपूर्ण चित्र पालटले आणि आता ५६० किलोमीटरने रस्त्यांची लांबी वाढली आहे.’ सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

स्थानिकांना रोजगारात प्राधान्य

लॉजिस्टिक पार्कमध्ये विदर्भातील उद्योजकांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा ना. गडकरी यांनी व्यक्त केली. ‘बाहेरचे उद्योग याठिकाणी येणारच आहेत. पण विदर्भातील मोठ्या उद्योजकांनीही गुंतवणूक करावी. विशेषतः वर्धा जिल्ह्यातील उद्योजकांनी पुढे येण्याची गरज आहे. याठिकाणी शेतीवर आधारित उद्योगांचाही विस्तार करता येईल. जेणेकरून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यात स्थानिकांना रोजगार देण्यास प्राधान्य असेल,’ असेही ना. नितीन गडकरी म्हणाले.

नागपूर-वर्धा अवघ्या ३५ मिनिटांत

नागपूर ते वर्धा या रेल्वे मार्गावर चौथ्या लाईनचे काम सुरू झाल्यामुळे तसेच नागपूर ते वर्धा ब्रॉडगेज मेट्रोचा करार झाल्यामुळे नागपूर-वर्धा अंतर केवळ ३५ मिनिटांत कापणे शक्य होईल, असे ना. नितीन गडकरी यांनी सांगितले. यावेळी सिंदी ते सेलडोह या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण आणि चौपदरीकरणासाठी १०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलू असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असेही ना. गडकरी म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत पाच हजार लाभार्थ्यांना मंजुरी

Fri Mar 15 , 2024
मुंबई :-सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यातील पाच हजार वीज ग्राहकांना एकाच वेळी मंजुरीचे संदेश मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पाठविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com