मुंबई :- “आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर संघाशी समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उज्ज्वल निकम यांना भाजपाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली.
“विजय वडेट्टीवार यांनी निरधारा आरोप केले असून याबद्दल मला वाईट वाटतंय. यामुळे पाकिस्तान सरकारला फायदा होऊ शकतो. ते असे दावे कशाच्या आधारे करत आहेत हे मला माहीत नाही. राजकारणात गुंतून तुम्ही आमच्या देशाची प्रतिमा मलिन करत आहात याचं आश्चर्य वाटतं”, असं उज्ज्वल निकम म्हणाले. “असे आरोप करून विरोधी पक्षनेते २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अनादर करत आहेत. ज्यांना माझ्या उमेदवारीची भीती वाटते ते अशा खोट्या बातम्या पसरवत आहेत”, असेही उज्ज्वल निकम म्हणाले.
निकम पुढे म्हणाले की, फाशीपूर्वी कसाबने एका न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबूल केले होते की मुंबई हल्ल्याच्या वेळी त्याने आणि लष्कर-ए-तैयबाचे भरती इस्माईल खान यांनी पोलिस जीपवर अंदाधुंद गोळीबार केला होता, ज्यामुळे करकरे आणि पोलीस पथकातील इतर दोघांचा मृत्यू झाला होता.