तृणमूल, उबाठा सत्तास्थापनेसाठी आग्रही, काँग्रेसची सावध भूमिका; चंद्राबाबू नायडू, कुमार इंडिया आघाडीत येणार?

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या निकालात एक्झिट पोल्सच्या विपरित निकाल लागले असले तरी २४० जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. जेडीयू आणि टीडीपी या पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी असल्यामुळे भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीवर सरकार स्थापन करणे अवघड नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीने मात्र सबुरीने घेत योग्य वेळी योग्य पाऊले उचलू, अशी भूमिका घेतली आहे. मात्र इंडिया आघाडीतील काही पक्ष विशेषतः तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उबाठा काही प्रमाणात आम आदमी पक्ष हे भाजपाला शह देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

द इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्याशी संवाद साधला होता. अखिलेश यादव यांनी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना इंडिया आघाडीत खेचण्याचा प्रयत्न करावा, असे तृणमूलकडून सूचित करण्यात आले होते. अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंह यादव आणि नितीश कुमार यांचे जवळचे संबंध होते. दोन्ही नेत्यांनी नव्वदीच्या दशकात एकत्र काम केले असून समाजवादी विचारांतून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती.

गुरुवारी ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते डेरेक ओब्रायन यांनी नवी दिल्लीत अखिलेश यादव यांची भेट घेतली. आम आदमी पक्षानेही सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने आणखी पक्षांना एकत्र आणण्याची रणनीती आखली आहे. ‘आप’चे नेते संजय सिंह आणि राघव चढ्ढा यांनीही बॅनर्जी यांची भेट घेतली. तसेच तृणमूलच्या बॅनर्जी आणि ओब्रायन यांनी दिल्लीत शिवसेना नेते संजय राऊत यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन मातोश्री येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची भेट झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी म्हटले, “लोकशाहीत आशा कधीही पल्लवीत असल्या पाहीजेत. जर कुणाला खूश करून सरकार स्थापन होत असेल, तर हाच आनंद दुसरेही देऊ शकतात. लोकशाहीत मतमोजणी झाल्यानंतरही आशा आणि अपेक्षा संपलेल्या नसतात. त्यामुळे आशेचा किरण जागृत आहे.”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडू आणि नितीश कुमार हे आताच त्यांची भूमिका बदलून इंडिया आघाडीबरोबर येतील, असे अखिलेश यादव यांना तरी वाटत नाही. पण भाजपाच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहीजे, असेही त्यांचे मत आहे.

दुसरीकडे काँग्रेस मात्र सरकार स्थापनेच्या अनुषंगाने आक्रमकरित्या विचार करत नसल्याचे दिसत आहे. इंडिया आघाडीकडे सध्या पुरसे संख्याबळ नाही. डाव्या नेत्यांचेही हेच मानने आहे की, संख्याबळ नसतानाही सरकार बनविण्यासाठी केलेला प्रयत्न अंगलट येण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी इंडिया आघाडीची दारे उघडी ठेवायची, असा काँग्रेसचा विचार आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने १० वर्ष सरकार चालविले, मात्र आता जनतेने नरेंद्र मोदी आणि भाजपाला नाकारले आहे. त्यामुळे हीच वेळ आहे. आपण सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहीजेत.”

द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तृणमूलच्या नेत्याने पुढे म्हटले की, बिगर मोदी-भाजपा सरकार स्थापन होणे, हीच मुळात मोठी बाब आहे. आघाडीचे सरकार स्थापन झाले तर नंतर काहीही होऊ शकते. तसेच डाव्यांना इंडिया आघाडीचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असेही आम्हाला वाटत नाही. इंडिया आघाडीतील समाजवादी पक्षाला ३७ जागा, तृणमूल काँग्रेसला २९ आणि शिवसेना उबाठाला ९ जागा मिळाल्या आहेत. आम्ही इतर पक्षांची री ओढत नाहीत, आमच्या स्वतःच्या भूमिका आहेत.

Source by loksatta
@ file photo

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor presents President’s Police Medals  to 115 Police Officers, Personnel

Fri Jun 7 , 2024
Mumbai :- The Governor of Maharashtra Ramesh Bais presented the Police Medals for Gallantry, President’s Police Medals for Meritorious Service and Police Medals for Meritorious Service to 115 Police Officers and Police personnel at an Investiture Ceremony held at Raj Bhavan, Mumbai on Thursday (6th Jun). The police medals announced on the Independence Day in 2021 and the Republic Day […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com