नागपूर : झाडांना खिळे ठोकून त्याद्वारे जाहिराती लावणा-यांविरुद्ध मनपाद्वारे कठोर पवित्रा घेण्यात आला आहे. झाडांना खिळे ठोकून जाहिरात, पोस्टर, भित्तीपत्रे लावणा-यांनी पुढील ३ दिवसांत सर्व जाहिरात काढण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. तीन दिवसानंतर ज्या जाहिरातदारांच्या जाहिराती झाडांवर दिसतील, त्यांच्यावर मनपाद्वारे पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र विरुपन प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्यात आले आहे. मुख्यत्वे रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड असल्याने जाहिरातदार या झाडांवर खिळे ठोकून जाहिरात लावतात. झाडांना खिळे ठोकल्याने झाडांना इजा पोहोचून नुकसान होते. शिवाय शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचून विद्रुपीकरण होते. त्यामुळे शहराचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने जाहिरातदारांनी आपली जबाबदारी ओळखून तीन दिवसात आपल्या जाहिराती काढण्याबाबत आवाहन आयुक्तांनी केले आहे. यानंतर झाडांवर आढळणा-या जाहिरातीसंदर्भात संबंधित जाहिरातदारांविरोधात मनपातर्फे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.