– विशेष योजनेत ४२ लाख ९५ हजारांची शास्ती माफी
– २ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी केला कराचा भरणा
चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. १० जानेवारीपासून आतापर्यंत २ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला असून, ४२ लाख ९५ हजार रुपये शास्ती माफी देण्यात आली. ज्या थकबाकीदारांनी अद्याप कर भरणा केलेला नाही त्यांना शेवटचे ७ दिवस शिल्लक असून, ३१ जानेवारी २०२२ पर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही कर भरता येणार आहे. शास्तीची सूट कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच लागू असून, थकबाकीदारांनी तत्काळ भरणा करावा, असे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भाव पसरु नये, यासाठी शासनाकडून माहे मार्च २०२० पासून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले. त्या काळात व्यापार व व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्ग आणि समाजाचे घटक कामगार वर्ग यांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे थकीत कराचा भरणा करता आला नाही. अशा घटकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याची सूचना महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी केली होती. त्यानुसार मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्याची घोषणा केली. मनपा आयुक्तांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या सोयीसाठी आणि वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी शनिवारी आणि रविवारी कार्यालयीन वेळेत झोन कार्यालयात कराचा भरणा करण्यात येत आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने १० ते २४ जानेवारीपर्यंत २ हजार ६०३ मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केला. त्यांच्याकडून एकूण सुमारे २ कोटी ९८ लाख इतकी थकीत होती. त्यावर ४२ लाख ९५ हजार रुपयांची शास्ती माफी देण्यात आली असून, त्यांनी २ कोटी ५६ लाख रुपये कराचा भरणा केलेला आहे.
ही सवलत ३१ जानेवारीपर्यंत असून, अखेरचे ७ दिवस शिल्लक आहेत, त्याचा लाभ घ्यावा. शास्ती माफी ही कोविड -19 तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन करण्यात आली असून, सर्व मालमत्ता धारकांनी लसीचे दोन्ही डोस घ्यावे, यासाठी हितावह अट घालण्यात आल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.