Ø पालकमंत्र्यांच्या बैठकीत दर्शनास मान्यता
Ø कळंब येथून होणार तीर्थ दर्शनाची सुरुवात
यवतमाळ :- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेरील तीर्थ क्षेत्रांना भेटू देऊन दर्शन घेता यावे, यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना अयोध्या येथे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लाभार्थ्यांना दर्शनासाठी मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंमलबजावणी आणि देखरेख व संनियंत्रण करण्याच्या उद्देशाने समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष डॉ.पकज आशिया व सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव मंगला मुन यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. योजनेच्या लाभासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन समितीच्यावतीने करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने जिल्ह्याभरातून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज सादर केले होते. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अर्ज केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अयोध्या तीर्थ दर्शनाचे स्थळ ठरविण्यात आले आहे. त्यानुसार 800 लाभार्थ्यांची अयोध्या येथे श्रीराम मंदीर दर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात 376 महिला व 424 पुरुष लाभार्थ्यांचा व सहाय्यक पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे.
लाभार्थ्यांच्या प्रवासाकरीता इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲन्ड टुरिझम कार्पोरेशन लिमिटेड आयआरसीटीसी मुंबई यांच्याकडून रेल्वेसह यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. तीर्थयात्रेचा कालावधी दि.24 ते 28 ऑक्टोबर असा आहे. दि.24 ऑक्टोंबर रोजी कळंब येथून प्रवास सुरु होणार आहे. अयोध्या तीर्थ दर्शन यात्रेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.