‘शिवजागर’द्वारे २०० कलाकार मांडणार छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास!

– महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नवी दिल्लीत ‘शिवजागर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

– शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त दिल्लीतील शिवप्रेमींसाठी मोठी पर्वणी

नवी दिल्ली :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नवी दिल्ली येथे ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार, दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वाजता सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात तब्बल २०० कलाकार आपल्या सादरीकरणातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास मांडणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून विवेक व्यासपीठाने कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारचे कलात्मक सादरीकरणाचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा इतिहास ‘शिवपर्व’ या भागातून मांडला जाणार आहे.

या कार्यक्रमाबाबत बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा जागर देशाच्या राजधानीत होत आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाने राज्यात, देशातच नव्हे तर जगभर विविध कार्यक्रम केले आहेत.

या ‘शिवजागर’ कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक, पराक्रमी वारसा अनुभवल्यानंतर येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच मुखातून ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे उद्गार निघतील, असा मला विश्वास वाटतो!”

देशाची राजधानी नवी दिल्ली येथे अशा भव्य, नेत्रदीपक कार्यक्रमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास उलगडला जाणार असल्याने येथील शिवप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे येथील अधिकाधिक शिवप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवछत्रपतींना मानवंदना द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिन विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गुणवत्तेच्या आधारावर उद्यमशीलता विकसित करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Sat Mar 9 , 2024
– ‘मध्य भारतात उद्यमशीलतेच्या संधी’ यावर चर्चासत्र नागपूर :- व्यवसाय करण्यासाठी भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठ आणि व्यावहारिकता या चार गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे असते. आपले उत्पादन चांगले असेल, त्याचे ब्रांडिंग आणि पॅकेजिंग उत्तम असेल तर ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोच. पण त्यासाठी गुणवत्तेच्या आधारावर उद्यमशीलता विकसित करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!