– राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठक संपन्न
चंद्रपूर :- ही लोकसभा निवडणूक केवळ तुमची,माझी किंवा कुटुंबाची नसून तर ही निवडणूक देशाच्या विकासासाठी असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर येथे मंगळवार, 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीला ते संबोधित करत होते. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकार, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीमधील सर्व पक्षांसोबत आपण कायमच योग्य सन्मान ठेऊन समन्वयाने वागलो असल्याने सर्व नेत्यांशी आपले संबंध चांगले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. विरोधीपक्ष नेते असो किंवा अपक्ष नेते असो विकास कामांना आपण कायम प्राथमिकतेवर केल्याचे ते म्हणाले. अजित दादा पवार यांनी देखील ही निवडणूक विकासाची असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे एक ध्येय ठेऊन स्थानीक स्वराज्य संस्था, नगरपालिका या स्तरावरचे आपल्या एकत्रित अनुभवाचा फायदा एकमेकांना होईल, असे बघितले पाहिजे. ही युती दीर्घकालीन टिकली पाहिजे, असे ते म्हणाले.