मुंबई – आता आम्ही विरोधी पक्षात बसलो आहोत तर विरोधी पक्षाचे काम नक्कीच चांगले करू आणि महाराष्ट्रातील जनतेचा पुन्हा एकदा विश्वास जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रदेश कार्यालयात आले त्यावेळी माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेबांना आयकर विभागाची नोटीस आल्याचे आम्हाला देखील कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच कळले. मागच्या चार निवडणुकीत पवारसाहेबांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्राची माहिती मागविण्यात आली आहे. पवारसाहेबांना नोटीस पाठविण्याऐवजी आयकर विभागाने जर निवडणूक आयोगाकडून ही माहिती घेतली असती तर त्यांना तिथून मिळाले असतीच परंतु जाणीवपूर्वक यंत्रणांचा गैरवापर करुन प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा सुरु असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही, पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जिथे – जिथे शक्य होईल, तिथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु, असेही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली असून ते चौकशीला सामोरे गेलेले आहेत. ते निर्दोष असून त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. आजच्या चौकशीच्या शेवटी ईडीचे दिल्लीतील अधिकारी काय निर्णय देतात हे पाहावे लागेल. कारण याआधी आमचे देखील नेते दिवसा चौकशीला गेल्यानंतर त्यांची रात्रीपर्यंत चौकशी चालली आणि रात्री उशीरा त्यांच्या अटकेच्या बातम्या येतात. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात ईडी जाणीवपूर्वक टोकाची भूमिका घेणार नाही, अशी अपेक्षा आपण करुयात असेही जयंत पाटील म्हणाले.