– नॅशनल पेडियाट्रिक युरोलॉजी कॉन्फरन्सचे उद्घाटन
नागपूर :- भारत सरकारने शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्राला विशेष प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रात विकास होणे सर्वसामान्य जनतेच्या सोयीचे आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पण हा वापर अधिक प्रमाणात वाढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) केले.
इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनच्या वतीने आयोजित ११व्या नॅशनल पेडियाट्रिक युरोलॉजी कॉन्फरन्सचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला किम्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भास्कर राव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभीये, दिल्लीतील एम्सचे अधिष्ठाता प्रो. एम. बाजपेयी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी यांनी ‘मेडिकल इंजिनियरिंग’ या संकल्पनेकडे सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रात डिजीटल, इलेक्ट्रॉनिक्स आदी तंत्रांचा वापर झाल्यास विविध प्रक्रिया वेगाने होऊ शकतात. तंत्रज्ञानाचा वापर आज वैद्यकीय क्षेत्रात होत असला तरीही त्याचे प्रमाण वाढले तर रुग्णसेवकांसाठी आणि रुग्णांसाठी अधिक फायद्याचे ठरणार आहे.’ अमेरिका आणि इंग्लंडमध्ये कार्यरत भारतीय डॉक्टरांना खूप मान-सन्मान व प्रतिष्ठा आहे, याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘वैद्यकीय क्षेत्र भारताच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान देत आहे. प्रत्येक क्षेत्रात ज्याप्रमाणे नेतृत्व कौशल्य महत्त्वाचे आहे तसेच वैद्यकीय क्षेत्रातही आहे. या नेतृत्वाच्या दूरदृष्टीतूनच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येणार आहे,’ असेही ना. गडकरी म्हणाले. कॉन्फरन्ससाठी भारताच्या विविध भागांमधून तसेच बाहेरील देशांमधून आलेल्या डॉक्टर मंडळींचे ना. गडकरी यांनी स्वागत केले.