Ø विद्यापीठात पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शिक्षणासह विद्यार्थ्यांना रोजगार देणारे मोठे दालन खुले केले असल्याचे प्रतिपादन प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या महाराज बाग येथील छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक परिसरातील दीक्षांत सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा आज आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन करताना डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे उपायुक्त प्रकाश देशमाने, विद्यापीठ रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, कौशल्य विकास अधिकारी ज्योती वासुरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पूर्वी केवळ अभियांत्रिकी, व्यवस्थापन व फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याचे सांगत प्र-कलगुरु डॉ. दुधे यांनी विद्यापीठाने बीए बीकॉम, बीएससी व अन्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा म्हणून प्लेसमेंट सेल सुरू केल्याचे सांगितले. या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. कंपन्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ देण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलने समर्थपणे सांभाळली आहे. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये देखील अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची निवड या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून झाल्याचे प्र-कलगुरूंनी सांगितले. कंपन्यांना हवे असलेले कौशल्य प्राप्त केलेले कुशल मनुष्यबळ देखील विद्यापीठाकडून तयार केले जात असल्याचे ते म्हणाले. कौशल्य विकास विभागाने नुकताच विद्यापीठ परिसरात मोठा महारोजगार मेळावा घेतला. यामध्ये 61 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर 11 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे रोजगार मेळावे प्रत्येक महिन्यातून आयोजित करावे असे आवाहन डॉ. दुधे यांनी केले.
कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश देशमाने यांनी मनोगत व्यक्त करताना कंपन्यांची मागणी पूर्ण व्हावी याकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले. स्थानिक उद्योग त्याच प्रकारे कंपन्यांच्या मागणीनुसार मनुष्यबळ मिळावे म्हणून विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करून देण्याचे कार्य देखील विभागाकडून होत आहे. विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या आवडीचा रोजगार मिळावा म्हणून विभागाकडून प्रयत्न होत असल्याचे देशमाने म्हणाले. पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्यामध्ये दहापेक्षा अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद देशमुख यांनी केले तर आभार विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.