नवी दिल्ली :- केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या 77 व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले.
“गंभीर जागतिक आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारताने ब्रिक्स हेल्थ ट्रॅक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सोबतच ब्रिक्स राष्ट्रांमधील आरोग्य प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने संयुक्त आरोग्य उपक्रमांना चालना देण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आहे” असे उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमानुसार मोठ्या प्रमाणावर होणारे संसर्गजन्य आजाराचे धोके रोखण्यासाठी आणि रोगांवर देखरेख ठेवण्यासाठी एक आरोग्य या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रिक्स एकात्मिक पूर्व चेतावणी प्रणालीची आवश्यकता अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले.
“भारताने आण्विक औषधे आणि किरणोत्सारी औषधनिर्माण विज्ञान क्षेत्रात ब्रिक्स देशांमधले सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे, असे अपूर्व चंद्रा यांनी सांगितले. भारताने विशेषत्वाने किरणोत्सारी औषधनिर्माण पुरवठा साखळी मजबूत करणे आणि आयसोटोप्सचे उत्पादन वाढवणे, प्रगत डिजिटल उपायांच्या विकासाला प्रोत्साहन देऊन त्यांचे व्यापारीकरण करणे यावर भर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विविध आरोग्यविषयक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सदस्य राष्ट्रांना सहकार्य वाढवण्याचे आणि एकत्र काम करण्याचे आवाहन करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.