अमरावती :- स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या विकासात मुद्रित माध्यमाचे योगदान अधिक राहिले आहे. वृत्तपत्रांनी देशात जनजागृती सोबतच लोकशिक्षणाचे काम देखील केले आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी लोक जागृती करणे हेच माध्यमांचे कार्य आहे. त्यामुळे या कार्यात इतर माध्यमांपेक्षा मुद्रित माध्यमांचे योगदान हे ठळकपणे दिसून येते, असे मत भारतीय प्रेस परिषदेचे माजी सदस्य आणि सांय दैनिक अमरावती मंडल व दैनिक मातृभूमीचे मुख्य संपादक अनिल अग्रवाल यांनी व्यक्त केले.
भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्रात दिनांक १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्य ‘राष्ट्र निर्मितीत माध्यमांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान व शोध पेपर सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संपादक अनिल अग्रवाल बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय निदेशक प्रा. डॉ. वीरेंद्र भारती होते. यावेळी विचारमंचावर प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ. विनोद निताळे, संजय पाखोडे उपस्थित होते.
पुढे बोलताना संपादक अनिल अग्रवाल म्हणाले, सोशल मीडियाने वृत्तपत्रांपुढे अनेक आव्हाने निर्माण केली आहे. त्यामुळे वृत्तपत्रांच्या वितरण संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी वाचकांचा विश्वास आजही वृत्तपत्रांवर टिकून आहे. या विश्वासार्हतेमुळे येणाऱ्या काळात वृत्तपत्रे सोशल मीडियाचे आव्हान परतवून लावणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. वीरेंद्र भारती म्हणाले, मुद्रित माध्यमे ही जबाबदारीने काम करणारी माध्यमे आहेत. प्रकाशित होणारी वृत्तपत्रे हे पुरावा म्हणून असतात. सोशल माध्यमांच्या बाबतीत मात्र ही बाब लागू पडत नाही. त्यामुळे लोकशाहीत मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता अधिक आहे. भारतात प्रसार माध्यमांना अधिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे येथील लोकशाही ही अबाधित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दुपारच्या सत्रात मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी जनसंवाद आणि पत्रकारितेशी संबंधित विविध विषयावर शोध पेपर सादर केले. या सत्राचे सूत्रसंचालन शिवानी, निकिता, पूर्वा आणि जया या विद्यार्थिनींनी केले तर आभार डॉ. विनोद निताळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थानतर्फे संपादक अनिल अग्रवाल यांचे स्वागत डॉ. राजेश कुशवाहा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाची रूपरेषा मनीषा गुप्ता हिने सांगितली. वक्त्यांचा परिचय आणि प्रास्ताविक प्रा. अनिल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन शुभांजल सिंह आणि सिल्की शौर्य यांनी तर आभार प्रा. डॉ. राजेश कुशवाहा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह संजय पाखोडे, राजेश झोलेकर, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, अनंत नांदुरकर, पंकज निखार आदीनी सहकार्य केले. यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.