– विद्यार्थ्यांची औषधी निर्माण शास्त्र विभागाला भेट
नागपूर :-पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी औषधी निर्माण प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माण शास्त्र विभागाला विद्यार्थ्यांनी भेट देत त्यांची जिज्ञासा पूर्ण केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विस्तार उपक्रम अंतर्गत आणि विज्ञान भारती विदर्भ प्रांत यांच्या सहकार्याने औषधी निर्माण शास्त्र विभागाने या भेटीचे आयोजन केले होते.
नवेगाव खैरीच्या राष्ट्रीय आदर्श विद्यालयातील ३० विद्यार्थी व ३ शिक्षक कर्मचारी या विभागीय भेटी कार्यक्रमात सहभागी झाले होते. औषधी निर्माण शास्त्र विभागातील डॉ. प्रकाश इटणकर यांनी भेटीचे समन्वयक म्हणून जबाबदारी पार पडली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विभागांची पाहणी केली. औषधी निर्माणशास्त्र रसायनशास्त्र विभागात त्यांना विविध औषधांचे रेणू, त्यांचे संश्लेषण आणि विश्लेषण आढळले. ही प्रात्यक्षिके संतोष सरगर, अतुल पवार व स्नेहा धनविजय यांनी सादर केली.
फार्मास्युटिक्स विभागात विद्यार्थ्यांना सूरज कौसे, दर्शन वाघमारे व योगेश चैनानी यांनी मार्गदर्शन केले. तेथे विद्यार्थ्यांना विविध औषधांचे फॉर्म्यूलेशन, डोसेज फॉर्म आणि भारतासाठी तसेच जगभरातील त्यांच्या उत्पादनाविषयी माहिती मिळाली. फार्माकोलॉजी विभागात नवीन औषध रेणूची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्राणी वापरले जातात. प्राणी कसे वापरले जातात हे विद्यार्थी शिकले. विद्यार्थ्यांना भावेश वर्मा व उत्कर्ष पाटील यांनी मार्गदर्शन केले. फार्माकॉग्नोसी विभागात विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पतींच्या बागेला भेट दिली. औषधी वनस्पती सामग्रीची ओळख, संकलन याबद्दल ज्ञान मिळवले. प्रयोगशाळेला भेट देऊन त्यांनी विविध हर्बल औषधांवर प्रक्रिया करणे, औषधांना काढणे , वेगळे करणे आणि त्यांची औषधी उत्पादने शिकली. यासाठी त्यांना जगदीश बनकर, काजल बोंद्रे, प्रतीक्षा वाघ, सुरभी भोपे, अंकिता पांडे, शुभम डोमडे, दर्शना भोसले, केतकी मुळेकर, शैलेश पेंडोर आणि मनीषा बसंतवानी यांनी मार्गदर्शन केले. रिसर्च स्कॉलर योगेश निकम, सुहास दसवाडीकर, सतीश मेश्राम आणि अनिल बडनाळे यांनी या भेटीचे निरीक्षण केले. नया भेटीत विद्यार्थ्यांना औषधीनिर्माण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती मिळाली.