– मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देईनात
– महासंचालक कार्यालयाची गोलमाल उत्तरे
मुंबई :- माध्यमांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींबाबत सातत्याने अन्यायाची भूमिका घेतली जात आहे. सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग याला जबाबदार आहे. सरकार आता निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही भूमिका घेत आहे. हा अन्याय थांबवा. माध्यमांना नियमाप्रमाणे जाहिराती द्या. जाहिरातीचे देयके वेळेवर काढा. अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे.
६ ते ८ मार्च या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांना विकसित भारत व विकसित महाराष्ट्रच्या दर्शनी जाहिरात वितरित करण्यात आलेल्या आहेत, परंतु या जाहिराती वाटपात महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावलण्यात आले. असे का? विशेष मोहिमेंतर्गत एका जाहिरातीखेरीज काही समकक्ष दैनिकांना अधिकच्या जाहिरातींचे वितरण करण्यात येत आहे. असे का? बाकी दैनिकांनी काय पाप केले, असा प्रश्न ‘व्हॉईस ऑफ मीडिया ’ने उपस्थित केला आहे.
जाहिरात वितरण करताना या विभागाचा आळसीपणा पुढे येत आहे. जर रात्री अकरा वाजता जाहिराती मिळत असतील तर, ती जाहिरात पानावर लावून अंक छपाईसाठी द्यायचा कधी, हा प्रश्नही निर्माण होतो. अनेक जाहिरातीची बिले २०१९ पासून निघालेली नाहीत. म्हणजे १९ ते आत्ता २४ पर्यंत अनेक बिलांची देयके तशीच प्रलंबित आहेत. जाहिराती मिळत नाहीत, मिळाल्या तर त्या देताना विलंब केला जातो, दिल्या तर त्याचं बिल चार चार वर्षे थकवले जातात. हा सगळा कारभार छोट्या दैनिकांना, आणि साप्ताहिक, मासिक यांच्या मालक, संपादक, पत्रकार यांना प्रचंड यातना देणारा आहे. हा अन्याय आहे. या बाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत अनेक वेळा सरकार आणि माहिती महासंचालनालय यांना पत्रव्यवहार केला. त्यांच्या कार्यालायासामोर उपोषण केले.
विकसित भारत व विकसित महाराष्ट्रच्या दर्शनी जाहिरात राज्यातील साप्ताहिक यांना का दिली नाही, असा जाब विचारत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या शिष्टमंडळाने राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. राहुल तिडके यांची भेट घेतली. ब्रिजेश सिंह यांनी या संदर्भात बजेटचा विषय आहे, असे उत्तर दिले. तर तिडके यांनी ठरवून दिलेल्या नियमावलीत आम्ही काम केले आहे, असे सांगितले.
याच विषयांच्या अनुषगाने गेल्या आठ दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण ते भेटण्यासाठी वेळ देत नाहीत, असे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी सांगितले.
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाची दुपटी भूमिका : संदीप काळे
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभाग राज्य सरकारच्या इशारावर चालतोय, हे साप्ताहिकांना जाहिराती न देऊन पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारची दुप्पटी भूमिका सुरु आहे. छोटी माध्यमे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात. त्या माध्यमांच्या जाहिराती बंद करून सरकार काय साध्य करू पाहते, असा सवाल आहे. काही ठराविक दैनिके, साप्ताहिके, मासिके याबाबत ही दुपट्टी भूमिका जर सरकारने आणि राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने थांबवली नाही तर, व्हॉईस ऑफ मीडियाला उपोषणाचे हात्यार उपसावे लागेल, असा इशारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी दिला आहे.