नागपूर :- जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जमिनीचे, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा 1 लाख 97 हजार 273 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 273 कोटी 10 लाख 3 हजार 109 रुपयांचे अर्थसहाय्य जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटकर यांनी दिली.
जिल्ह्यास 339 कोटी 68 लाख 53 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून 80.37 टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे उर्वरित 19 टक्के निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकला नाही. येत्या दोन-तीन दिवसात दुष्काळ पीडीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.