– महिला प्रवाशांना निर्भया पथकाचे कवच
– पथकातील कर्मचार्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न
– कंत्राटी कामगारांना बंधनकारक असावे पोलिस प्रमाणपत्र
नागपुर :- धावत्या रेल्वेत महिला, तरुणींशी होणारे अश्लील चाळे, त्यांच्याशी होणारी गैरवर्तणूक आणि गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी लोहमार्ग पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. नागपूर विभागातील कंत्राटी कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचा निर्णय लोहमार्ग पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वेस्थानक, रेल्वेगाडी आणि परिसरात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या सर्व कामगारांचे पोलिस रेकॉर्ड लवकरच मिळविण्यात येणार आहेत. पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये मंगळवार, 16 जानेवारीला एका बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. अचानक झालेल्या अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अशी खबरदारी लोहमार्ग पोलिस प्रशासनाने घेतली आहे.
रेल्वे स्थानकावर काम करणारे बहुतेक कर्मचारी परप्रांतीय आहेत. अशा कामगारांविषयी संपूर्ण माहिती पोलिसांकडे असणे आवश्यक आहे. कंत्राटी कामगारांचे पोलिस अभिलेखावर नाव आहे काय, त्याचे चारित्र्य कसे आहे, याविषयीची संपूर्ण माहिती मिळविण्यात येणार आहे. अर्थात कामगारांची जन्मकुंडलीच पोलिस मिळवतील. कामगारांची माहिती मिळाल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविता येईल.
लोहमार्ग पोलिसांचे निर्भया पथक महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहे. धावत्या रेल्वेत ते प्रवाशांपर्यंत पोहोचते. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेते. आता या निर्भया पथकाला पुन्हा सक्रिय करण्यात येणार असून, पथकातील कर्मचार्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. या पथकाच्या प्रमुख एपीआय विभावरी रेळेकर आहेत. पथकात एकूण आठ कर्मचारी आहेत. एका गाडीत दोन अशा प्रकारे चार गाड्यांत हे पथक असते. सुरक्षा विभागाकडून काही गाड्या चिन्हांकित केल्या असून विशिष्ट गाड्यांवर निर्भया पथक लक्ष ठेवून राहील. नागपूर ते गोंदिया, वर्धा, अमरावती अप-डाऊन अशी निर्भया पथकाची नियमित पेट्रोलिंग असते. याशिवाय लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफ पथकांची पेट्रोलिंग असते.
प्रवासी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद आवश्यक
रेल्वेमधून प्रवास करणार्या प्रवाशांची आणि त्यांच्या सामानाची सुरक्षा हे लोहमार्ग पोलिसांचे मुख्य कर्तव्य आहे. प्रवासी आणि पोलिसांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक असल्याने अलीकडे लोहमार्ग हेल्पलाईन क्रमांक -1512 कार्यान्वित करण्यात आला आहे. आता कंत्राटी कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय निर्भया पथकाला सक्रिय करून कर्मचार्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. अडचणीत असलेल्या प्रवाशांनी हेल्प लाईनवर माहिती द्यावी, पोलिसांना कळवावे.
डॉ. अक्षय शिंदे, लोहमार्ग पोलिस अधीक्षक