मुंबई :-समाजातल्या सर्व घटकांना कोणताही भेदभाव न करता योजनांचा लाभ मिळत आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता यासारख्या सोयी सुविधांचा लाभ सर्वांना मिळावा हीच मोदी सरकारची हमी आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी सांगितले.
मुंबईतल्या चेतना महाविद्यालयच्या प्रांगणात विकसित भारत संकल्प यात्रे निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिरिष चौधरी, आमदार कालीदास कोळंबकर, यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या साडे नऊ वर्षात लोककल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना देशात राबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. आगामी काळातही सबका साथ सबका विकास यावर आधारित सरकारची वाटचाल सुरू राहील असे गोयल म्हणाले.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यतातून संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण मुंबईतल्या चेतना महाविद्यालयाच्या प्रांगणात पाहण्यासाठी मोठ्या संख्येने युवक-युवती आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम स्थळावर उज्वला गँस योजना, पीएम-स्वनिधी योजनेचा स्टाँल लावण्यात आला. तसेच मुंबई महापालिकेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीरही भरवण्यात आले होते.