मुंबई :- आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉन-२०२४ आयोजित स्पर्धेला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, मुंबई मनपा आयुक्त इकबालसिंह चहल, पश्चिम नौसेना मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय सिंह, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल एच. एस. काहलों, यांनी उपस्थित राहून या मॅरेथॉनमध्ये मध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, टाटा मॅरेथॉन ही जगातील अतिशय प्रतिष्ठित मॅरेथॉन असून गेली १९ वर्षे तिचे यशस्वी आयोजन होत आहे. यंदा या स्पर्धेत ५९ हजाराहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. आपल्या वयाच्या आणि शारीरिक मर्यादांचा विचार न करता सर्व वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतात हे या स्पर्धेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
या मॅरेथॉनमध्ये एकूण ५९,५१५ स्पर्धकांनी भाग घेतला असून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू सहभाग आहे. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे.
टाटा मुंबई हाफ मॅरेथॉन विनर (२१.०९७ किलो मीटर)
प्रथम क्रमांक : सावन बरवाल – १ तास ५ मिनटे ७ सेकंद
द्वितीय क्रमांक : किरण म्हात्रे – १ तास ६ मिनटे २३ सेकंद
तृतीय क्रमांक : मोहन सैनी – १ तास ६ मिनटे ५५ सेकंद
विशेष म्हणजे हे तीनही विजेते इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत.
महिला हाफ मॅरेथॉन विजेते 21.97 किमी
प्रथम क्रमांक : अमरीता पटेल – १ तास १९ मिनटे २० सेकंद
द्वितीय क्रमांक : पूनम दिनकर – १ तास १९ मिनटे २० सेकंद
तृतीय क्रमांक : कविता यादव – १ तास २० मिनटे ४५ सेकंद
४२.१९५ किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली होती.
२१.०९७ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता माहीम रेतीबंदर, माहीम कॉजवे इथून सुरू झाली होती. तर १० किलो मीटरची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली.