मुंबई शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी १४ ठिकाणी हवा तपासणी केंद्र – मंत्री दीपक केसरकर

नागपूर : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली पाहिजे व मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईत १४ ठिकाणी हवा तपासणी केंद्रे उभारण्यात आली असून त्यातील तीन तपासणी केंद्रे कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत आराखडा तयार करण्यात आला असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्यात येते, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली.

मुंबई शहरातील हवेचा दर्जा अतिशय वाईट असल्याची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंद केल्या बाबत लक्षवेधी सूचना सदस्य अतुल भातकळकर यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर बोलत होते.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी झाले पाहिजे. यावर तोडगा काढण्यासाठी 15 दिवसात सर्व लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेऊन त्यांच्या सूचना व हरकती यांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. मुंबई वायू प्रदूषण नियंत्रण कृती आराखड्यातील मार्गदर्शक सुचनांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सौर उर्जेचे विविध स्रोत तयार करणे, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे, वाहतूक सिग्नलमध्ये सुसूत्रता आणणे, स्मशानभूमीत पाईप्ड नॅचरल गॅसचा (PNG) वापर करणे, स्वयंचलित वातावरणीय वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे (CAAQMS) प्रस्थापित करणे, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची स्थापना करणे, रस्त्यांची साफसफाई करण्याकरीता यांत्रिक झाडूचा वापर करणे तसेच मियावाकी संकल्पनेवर आधारीत जैव विविधतेच्या दृष्टिने उद्याने विकसित करणे इत्यादी उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत हवेतील प्रदूषण कमी करण्याकरिता पाच वाहतूक नाक्यांजवळ धुळ क्षमन संयंत्रे बसविण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

हवा प्रदूषण नियंत्रण करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत हवेची गुणवत्ता चाचणी, पर्यावरण दक्षता केंद्राची स्थापना, वाहतूक कोंडीच्या ठिकाणी वायु संयंत्रणेची उभारणी, हवा प्रदूषण कमी करण्यासंदर्भात सर्व संबंधितांना निर्देश देणे, इ. कार्यवाही करण्यात येते. हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वाऱ्याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सततच्या तयार होणाऱ्या प्रदूषकांचा निचरा न झाल्याने हवेतील त्याचे प्रमाण वाढत जाते. शहरीकरणामुळे मुंबईतील बहुतांशी उद्योग नजिकच्या ठाणे व रायगड जिल्ह्यात स्थलांतरीत झाले आहेत. मुंबईतील जागेच्या वाढत्या किंमती व औद्योगिक प्रक्रियेतील रसायनांचा वापर इ. बाबींमुळे बहुतांशी उद्योजकांनी त्यांचे उद्योग मुंबई परिसरात बंद करुन पर्याप्त जागी स्थलांतरीत करण्यात आले आहेत. आक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आलेल्या वायु सर्वेक्षणाच्या अहवालानुसार तरंगणाऱ्या धुलिकनांची संख्या वाढल्याने हवेची गुणवत्ता खराब होते. हवेतील हे धूलिकन खाली राहावे यासाठी नवीन यंत्रणेचा प्रायोगिक तत्वावर वापर करणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आदित्य ठाकरे, योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com