– गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य स्वागत समारंभ संपन्न
चंद्रपूर :- विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वांत जास्त वाघ असणाऱ्या ताडोब्याचा ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. आता जिल्ह्यातील वाघांचे प्रतिनिधित्व करीत, ‘आम्ही मागास नाही’ अशी डरकाळी लोकसभेत फोडायची आहे, असा निर्धार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार, संदीप धुर्वे, अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरा भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, लोकसभा प्रमुख प्रमोद कडू, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, निलेश मत्ते , नितीन भटारकर, बंडू हजारे, जयप्रकाश कांबळे, राजू भगत, राजू कक्कड, प्रज्वलंत कडू, रवी बेलूरकर, संतोष पारखी, सविता कांबळे, ब्रिजभूषण पाझारे, सर्व समाजाचे धर्मगुरू, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रपूर शहरात प्रथम आगमनानिमित्त ना. मुनगंटीवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. येथील गांधी चौकात त्यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधतांना ते म्हणाले, ‘आज मी नागपूरपासून चंद्रपूरमधील गांधी चौकापर्यंत पोहोचत असताना जनतेचे प्रेम बघितले. कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला आणि इथे असणाऱ्या महायुतीच्या सर्व नेत्यांचा पाठिंबाही बघितला. इथे सर्व धर्मगुरूंचा आशीर्वाद घेताना मी भारावून गेलो आहे.’
‘मी तुमच्या आशीर्वादाच्या मोबदल्यात एकच वचन द्यायला आलेलो आहे. तुमच्या प्रेमाच्या कर्जाचे व्याज मी देईल ते फक्त आणि फक्त विकास करून. आता दिल्लीपर्यंत चंद्रपूरचा आवाज बुलंद करणार आहे. तुम्हाला मी आश्वस्त करतो की, की कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कामरूखपासून ते कच्छपर्यंत संसदेत चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभेचा आवाज हा नेहमी आघाडीवर असेन,’ असे ना. मुनगंटीवार म्हणाले.
‘चंद्रपूरला कधीही विसरलो नाही’
‘मी कधीच मनामध्ये काम झाले आणि विसरलो असे केले नाही. मी तीन टर्म चंद्रपूर विधानसभेचा आमदार होतो. पण चंद्रपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व नसताना मात्र कदापीही चंद्रपूरला विसरलो नाही, कारण मला याची जाणीव होती की, या शहराच्या, या मतदारसंघाच्या प्रेमाचे कर्ज माझ्यावर आहे. मी बल्लारपुर चा विकास करत असताना चंद्रपूरला कधीही विसरलो नाही’, असे ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले.