– योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड
नागपूर :- रेशीमबाग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला. या समारंभास बहिणींचा मिळालेला सहभाग हा केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांचे महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भव्य आकाराच्या सहा डोममध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक महिलांना मुख्यमंत्री व मान्यवरांनी प्रत्येक डोममध्ये जाऊन महिलांच्या स्वागताचा स्वीकार केला. याचबरोबर जो उत्स्फूर्त विश्वास महिलांनी या योजनेप्रती व्यक्त केला त्याबद्दल कृतज्ञ भावही व्यक्त केला.
मध्य प्रदेश सीमेवरील रामटेक तालुक्यातील अतिदुर्गम भागापासून सर्व तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थित होती. प्रत्येक तालुक्यातून महिलांना आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था व पदोपदी घेतलेली सुरक्षितता लक्षवेधी ठरली. महिलांना आरोग्याचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेण्यासमवेत इतर आवश्यक व्यवस्थाही प्रत्येक वाहनांमधून करण्यात आली होती.
वैशाली सामंत यांनी ‘बहिणीं’ना धरायला लावला ठेका
सकाळी अकरा वाजल्यापासूनच भगिनींचा उत्साह पाहायला मिळाला. ना कुठली कुरबुर… ना कुठली तक्रार! यात गायिका वैशाली सामंत यांनी प्रथितयश गाण्यांसह बहिणींना भावणारे विविध गाणे सादर करून ठेका धरायला लावला. सोबत देशभक्तीपर गीत सादर करून सभागृहाची मने जिंकली.
महिलांची संख्या ५० हजारांवर
या समारंभासाठी संपूर्ण रेशीमबाग मैदानावर भव्य आकाराचे सहा डोम उभारण्यात आले होते. यात हवा खेळती राहावी व प्रत्येकाला सुरक्षित जाता यावे यासाठी प्रत्येक गाव व वॅार्डनिहाय महिलांची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे ५० हजार महिला सभागृहात उपस्थित असुनही आणखी हजारो महिला कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या. त्यांची तत्काळ व्यवस्था सुरेश भट सभागृहासह इतर दोन सभागृहामध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे या सभागृहामध्ये मुख्य कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.
आर्थिक स्तर उंचावण्यास तसेच मुलांच्या शिक्षणासाठी या योजनेची मदत होईल. निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरली आहे. दरमहा मिळणारी 1500 रुपये ही रक्कम अत्यंत सहाय्यकारी असल्याचे प्रातिनिधीकरित्या बहिणींशी संवाद साधताना अधोरेखित झाले.
कोणत्याही स्थितीत ही योजना बंद होणार नाही असा विश्वास घेऊन हजारो बहिणी समारंभस्थळावरून घराकडे मार्गस्थ झाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्री नागपूर विमानतळ येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूर सुधार प्रन्यासचे संजय मीणा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
हेडगेवार स्मारकाला भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रेशीमबाग येथे डॅा. हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.