नागपूर : ‘जी-२०’ (G20) बैठकीनिमित्त राज्य सरकारनेही तिजोरी उघडली असून, जवळपास पावणेदोनशे कोटींचा निधी देणार आहे. नागपूर शहरात पहिल्या टप्प्यात रस्ते दुरुस्ती, सौंदर्यीकरण आदी कामासाठी ५० कोटी मंजूर केले आहे. याशिवाय महापालिकेने १२२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला असून, तोही मंजूर होण्याची शक्यता आहे. महापालिकेनेही २४ कोटींची कामे स्वतःच्या निधीतून सुरू केली आहे. ‘जी-२०’ बैठकीनिमित्त शहराचा कायापलट होत असून, एकूण दोनशे कोटींपर्यंत खर्च येणार आहे.
येत्या मार्चमध्ये जी-२० बैठकीसाठी जवळपास ३८ देशांचे मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, त्यांचा स्टाफ नागपुरात येणार असून तीन दिवस मुक्काम राहणार आहे. दोन दिवस बैठकीचे राहणार असून येणाऱ्या पाहुण्यांसाठी त्यांच्या देशातील पदार्थांसोबत मराठमोळी पुरणपोळी, झुनका भाकरीचाही जेवणाच्या ‘मेन्यू’त समावेश राहणार आहे. ‘जी २०’ परिषदेअंतर्गत बैठकीसाठी नागपुरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे स्वागत आणि सरबराईसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
शहरातील रस्ते चकाचक होत असून नवीन पथदिवे, रस्त्यांच्या बाजूने हिरवळ, रोषणाई करण्यात येत आहे. यासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. त्यांच्या स्वागतासाठी कुठेही कमतरता राहणार नाही, याबाबत महापालिका प्रशासन दक्ष आहे. विदेशी पाहुणे तीन दिवस नागपुरात राहणार असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था लि मेरेडियन तसेच रेडीसन ब्लू येथे करण्यात आली आहे. या दोनपैकी एका हॉटेलमध्ये बैठक होणार आहे.
यादरम्यान जेवणात पाहुण्यांच्या देशातील खाद्यपदार्थ, जेवणाचा समावेश राहणार आहे. पाहुण्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या पदार्थावर बारकोड राहणार असून त्यातून पदार्थ कसे, कशापासून तयार करण्यात आले, याबाबत माहितीही राहणार आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती शिवाय सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ढोलताशा आणि लेझीमच्या तालावर तसेच फेटे बांधून त्यांच्या स्वागताचीही तयारी केली जात आहे.