संकल्प स्वच्छतेचा अंतर्गत मुख्यद्यापकांची कार्यशाळा
नागपूर :- कचऱ्याची समस्या ही देशात सर्वत्र भेडसावणारी मोठी समस्या आहे. एकट्या नागपूर शहरातून रोज सुमारे 1200 मेट्रिक टन अर्थात महिन्याला जवळपास 35 हजार मेट्रिक टन कचरा निघतो. या कचऱ्यामुळे शहराबाहेर मोठमोठे ढिगारे निर्माण झाली आहेत. कचऱ्याच्या समस्येवर शासन आणि प्रशासन विविध स्तरावर योग्यरीत्या काम करीत आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावल्यास ही समस्या सुटू शकते. मात्र यासाठी आधी माझा कचरा ही माझी जबाबदारी आहे, त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावली जाणे आवश्यक असल्याची संकल्पना वृद्धिंगत होणे गरजेचे आहे. यासाठी शाळांची भूमिका महत्वाची असून, शाळेतून घराघरात ही संकल्पना रुजविली जावी, अशी अपेक्षा मनपा उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी व्यक्त केली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित स्वच्छता विषयक विविध स्पर्धांच्या माहिती संदर्भात नागपूर शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा शनिवारी (ता.19) रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
मंचावर जिल्हा परिषदे नागपूर (माध्य.) चे शिक्षणाधिकारी रवींद्र कटोलकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकरी रोहिणी कुंभार, मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उपायुक्त डॉ गजेंद्र महल्ले पुढे म्हणाले की, आपले शहर स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. शहरातील रस्ते विविध चौक स्वच्छ रहावे याकरिता महानगरपालिकेचे स्वच्छता दूत कार्य करीत आहेत. कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याकरिता मनपाद्वारे ‘स्वच्छता के दो रंग, हरा गिला, सुखा निला’ उपक्रम राबविल्या जात आहे. उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरीच कचऱ्याचे वर्गीकरण करावे, याकरिता दोन कचराकुंडी ठेवाव्यात घरातील ओला कचरा हिरव्या कचराकुंडीत आणि सुखा कचरा निळ्या कचराकुंडी टाकून तो घरी येणाऱ्या स्वच्छता दूत यांना द्यावा. असे झाल्यास शहराबाहेर लागणारे कचऱ्याचे ढिगारे आपोआप कमी होतील. याशिवाय मनपातर्फे स्वच्छता वेळोवेळी जनजागृती केल्या जात आहे. या उपक्रमाला नागरिकांची उत्तम साथ मिळत आहे, असेही ते म्हणाले.
पुढे डॉ गजेंद्र महल्ले यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपाद्वारे आयोजित केलेल्या स्वच्छता विषयक विविध स्पर्धांची माहिती देत मुख्याध्यापकांनी शिक्षक, विद्यार्थी यांना स्पर्धेची माहिती द्यावी तसेच पालक सभा घेत घरोघरी स्वच्छतेचा जागर करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले की, स्वच्छता विषयी जागृती विद्यार्थ्यांमध्ये होणे गरजेचे आहे. हेच विद्यार्थी पुढे चालून देशाचे सुजाण नागरिक होतील. त्यामुळे शाळा सुजान नागरिक घडविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. एक विद्यार्थी आपल्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनाही स्वच्छतेची माहिती देत जागृत करू शकतो. त्यामुळे शाळांनी मोठ्या संख्येत स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तसेच स्वच्छ शाळा स्पर्धेमध्ये मनपाच्या सर्व शाळांनी सहभागी घ्यावा याकरिता शाळा, वर्गखोल्या, कार्यालय, परिसर स्वच्छ व निटनेटका ठेवावा. तसेच सर्व शिक्षकांनी ‘स्वच्छता अॅप’ डाऊनलोड करावा. याकरीता घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आपल्या शाळेची तपासणी करण्यात येऊन गुणांकन करण्यात येईल व प्रभाग निहाय शाळांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही डॉ. महल्ले यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदे नागपूर (माध्य.) चे शिक्षणाधिकारी रवींद्र कटोलकर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होणाऱ्या स्वच्छतेबाबत माहिती दिली. शिवाय शाळा ही विद्यादायी असल्याने स्वच्छते विषयीची विद्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून घराघरात देता यावी म्हणून मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक मनपाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी तर मनपाचे सहाय्यक शिक्षण अधिकारी सुभाष उपासे यांनी आभार मानले. या प्रसंगी स्वच्छ भारत अभियानचे समन्वयक अनित कोल्हे, शिक्षण विभागाचे समन्वयक विनय काळे, प्रशांत टेंभूर्णे आदी उपस्थित होते.
शहरातील विविध शाळेच्या मुख्याध्यापकांना कार्यशाळेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत पथनाट्य स्पर्धा, भित्तीचित्र स्पर्धा, जिंगल स्पर्धा, लघुपट स्पर्धा, रेखाचित्र/पोस्टर स्पर्धा, स्वच्छ चॅम्पियन्स स्पर्धा या सर्व स्पर्धाबाबत माहिती कार्यशाळेत देण्यात आली.
कार्यक्रमात सहायक शिक्षणाधिकारी सुभाष उपासे, राजेंद्र सुके, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक अनित कोल्हे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षण विभागाचे समन्वयक प्रशांत टेम्भूर्णे यांनी केले तर समन्वयक विनय बगले यांनी आभार मानले.
कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मनपाद्वारे आयोजित कार्यशाळेला नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसह जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी मुख्याध्यापकांच्या उपस्थितीने कविवर्य सुरेश भट सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांची ही गर्दी यावेळी लक्षवेधी ठरली हे विशेष.