राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे उत्तराखंड समाज गौरव व गढरत्न पुरस्कार प्रदान
मुंबई :- गढवाल भ्रातृ मण्डल, मुंबई या उत्तराखंड प्रदेशातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या लोकांच्या संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘गढरत्न’ व ‘उत्तराखंड समाज गौरव सन्मान २०२२’ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना रविवारी राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष रमण मोहन कुकरेती व महासचिव मनोज द्विवेदी उपस्थित होते.
उत्तराखंड आकाराने लहान राज्य असले तरीही आज उत्तराखंड येथील लोक देशविदेशात काम करीत असल्याचे नमूद करून उत्तराखंडच्या लोकांनी प्रामाणिकपणा, मनमिळावू स्वभाव व कठोर परिश्रम यामुळे आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
मूळ उत्तराखंडच्या लोकांनी आपल्या गढवाली, कुमाऊंनी व इतर बोलीभाषा आपापसात बोलताना वापराव्या असे आवाहन करताना भाषेशी नाळ कायम ठेवली तर त्या माध्यमातून प्रदेशाच्या इतिहास व संस्कृतीशी जुळून राहता येईल असे राज्यपालांनी सांगितले.
उत्तराखंड येथील गढवाल विश्वविद्यालय, श्रीनगर येथे इंग्रजीचे विभागप्रमुख असलेले डॉ. दाता राम पुरोहित यांना त्यांच्या लोककला, लोकसंस्कृती व लोकवाद्यांच्या प्रचार प्रसार कार्यासाठी प्रतिष्ठेचा ‘गढ रत्न’ सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते मनमोहन नौटियाल, बीरेंद्र प्रसाद बडोनी, मेजर शंभू प्रसाद मिश्रा (से.नि.), बंशीधर गैरोला, हरिश्चंद्र डबराल, बच्चीराम उनियाल, पूर्णचंद्र बलोदी, महावीर सिंह बिष्ट, डॉ. श्रीधर प्रसाद थपलियाल, बाळकृष्ण नरोत्तम शर्मा, भीष्म कुकरेती,जनार्दन प्रसाद शर्मा गोदियाल, दयाराम सती आदींना उत्तराखंड समाज गौरव सन्मान प्रदान करण्यात आले. मंडळाच्या अनेक दिवंगत पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा जीवन परिचय असलेल्या स्मरणिकेचे तसेच उत्तराखंड महोत्सवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गढवाल भ्रातृ मंडळ मुंबई ही मुंबईतील उत्तराखंडी लोकांची सर्वात जुनी संस्था सन १९२८ पासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.