मुंबई :- ऑस्ट्रेलियाचे उप महावाणिज्यदूत मायकेल ब्राऊन आणि मुंबईतील महावाणिज्यदूत कार्यालयाच्या प्रमुख मॅजेल हाइंड यांच्या शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानभवनात सदिच्छा भेट घेतली.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवन कार्यपद्धती याचबरोबर सर्वपक्षीय आमदारांचे शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर जाणार असल्याचीही माहिती दिली. यामध्ये जास्तीत जास्त महिला आमदार आहेत. महाराष्ट्रात स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा, त्यांचे हक्क यासाठी होत असलेल्या कामाची माहिती दिली.
राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारित असलेल्या महिला दक्षता कमिटीच्या माध्यमातून ज्या सामाजिक संस्थांमधून महिलांविषयक कार्य केले जात आहे त्यांचे समुपदेशनसुद्धा या माध्यमातून सुरू आहे. वाणिज्यदूतांमार्फत त्या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला तर त्याचा लाभ होईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
पोलीस हेल्पलाईन सुरू केल्याने विविध अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. महिलांमध्ये आपल्या हक्काची जागृती येण्यासाठी पोलिसांसाठी ‘स्त्री-पुरुष समानता: पोलीस मार्गदर्शक’ पुस्तिका तयार केली आहे. याच्या माध्यमातून आणि ऑनलाईन बैठकातूनही पिडीत महिला, मुली यांना प्रशिक्षणाद्वारे आधार देण्याचे काम आगामी काळात करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
येत्या १३ सप्टेंबर २०२३ रोजी विधानभवनामध्ये ‘फेमीनिस्ट फॉरेन पॉलिसी’ यावर कार्यशाळा होणार असून यामध्ये जपान, मेक्सिको, नेदरलँड, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा यांचे वाणिज्यदूत सहभागी होणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या वाणिज्यदूताने सहभागी व्हावे याबद्दल मायकेल ब्राऊन आणि हाइंड यांना डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रण दिले.
पोलीस मार्गदर्शक पुस्तिका जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रसारित होण्यासाठी ऑस्ट्रेलियन महावाणिज्यदूत सहाय्य करेल, असे ब्राऊन यांनी सांगितले.